मुंबई

केंद्रात एनडीए सरकार येताच, महाराष्ट्रात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार

रणजित गायकवाड

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे हा पराभव विसरून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जोमाने कामाला लागण्याच्या उद्देशाने केंद्रात एनडीएचे सरकार स्थापन झाल्यानंतर काही दिवसांतच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

एनडीएच्या बुधवारी झालेल्या बैठकीनंतर नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील नेत्यांशी संवाद साधून पराभवाची कारणे जाणून घेतली. राज्यात मराठा आरक्षणासह उमेदवारी वाटपातील घोळ आणि शेतकऱ्यांच्या गंभीर प्रश्नांकडे सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे भाजप व महायुतीला पराभवाचा धक्का बसल्याची माहिती राज्यातील नेत्यांनी मोदी यांना दिली.

सरकारविरोधातील असंतोषामुळे अल्पसंख्यांक, दलित, धनगरांसह मराठा समाजातील मोठा वर्ग महाविकास आघाडीकडे गेल्याचे मोदी यांना सांगण्यात आले. त्यावर हा पराभव विसरून आता विधानसभा निवडणुकीसाठी जोमाने कामाला लागा, अशी सूचना मोदी यांनी महायुतीच्या नेत्यांना केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

लोकसभेतील पराभवातून बाहेर पडून महायुतीमध्ये नवा जोश निर्माण करण्यासाठी पुढील पंधरा दिवसांत राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाकडून केली जाणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

SCROLL FOR NEXT