मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री फडणवीस, पवार कोल्हापूर दौर्‍यावर.  Pudhari File Photo
मुंबई

अजित पवार 'महायुती'तून बाहेर पडणार?; शिंदेंच्या मंत्र्यांमुळे वाद चिघळला

Mahayuti News | '२५ जागा मिळतील की नाही याची शाश्वती नाही'

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Maharashtra Health Minister Tanaji Sawant) यांना पक्षातून काढून टाकले नाही तर 'महायुती'तून बाहेर पडण्याचा (Mahayuti Politics) इशारा अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) गटाने दिला आहे. मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत मांडीला मांडी लावून बसल्यानंतर बाहेर येताच आपल्याला उलटी येते, असे वक्तव्य राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केले होते. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने संताप व्यक्त केला आहे. बाहेरचे प्रमाणापेक्षा अधिक खाल्ल्यावर उलटी होणारच, असा टोला राष्ट्रवादीने डॉ. सावंत यांना लगावला आहे.

...तर सत्तेतून बाहर पडलेले बरे- अजित पवार गट

''तानाजी सावंत जे बोलले ते ऐकून घेण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडलेले बरे. महायुती झाली म्हणून सावंत मंत्री झाले, हे त्यांनी विसरू नये. मी अजित पवार आणि आमच्या सर्व वरिष्ठ नेत्यांना सत्तेतून बाहेर विनंती करतो,” अशी प्रतिक्रिया अजित पवार गटाचे नेते उमेश पाटील यांनी दिली आहे.

सावंत यांच्यावर उपचारासाठी आग्रह धरू : राष्ट्रवादी

अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचे प्रवक्ते संजय तटकरे म्हणाले, आरोग्य मंत्रिपदावर असलेल्या व्यक्तीला उलटी येणे किंवा अन्य रोग असणे हे चांगले लक्षण नाही. इतकेच नाही तर यावरून त्यांचे स्वास्थ्य चांगले नसल्याचे स्पष्ट होते. प्रमाणापेक्षा जास्त खाल्ल्यामुळे उलटी होणे साहजिकच आहे. डॉ. सावंत है मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे नेते आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सावंत यांच्या आजाराबाबत काळजी घ्यावी. त्यांना डॉक्टरकडे न्यावे. अन्यथा आम्ही आमचे नेते अजित पवार यांच्याकडे सावंत यांच्या उपचारासाठी आग्रह धरू, असा टोला तटकरे यांनी लगावला.

२५ जागा मिळतील की नाही याची शाश्वती नाही- महेश तपासे

शरद पवार गटाचे प्रवक्ते महेश तपासे म्हणाले, शरद पवार यांच्या पक्षापासून फारकत घेत अजित पवार यांनी आपण राज्याच्या विकासासाठी सत्तेमध्ये जात आहोत, अशी घोषणा केली होती. प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे आदी नेत्यांनी त्यांना दुजोरा दिला होता. आता डॉ. सावंत यांनी अजित पवार यांच्या अस्तित्वावरच घाला घातल्यानंतर हे सर्व नेते गप्प का, असा सवाल तपासे यांनी उपस्थित केला. विधानसभा निवडणुकीवेळी महायुतीकडून ८० ते ९० जागा मिळवू, अशी घोषणा छगन भुजबळ यांनी केली होती. आता भाजप आणि शिंदे गटाने दटावल्यामुळे २५ जागा मिळतील की नाही याचीही शाश्वती अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला राहिली नाही. म्हणूनच त्यांना अशा प्रकारचा अपमान सहन करावा लागतो, असा टोलाही तपासे यांनी लगावला.

Mahayuti News : अजित पवारांचा स्वाभिमान कुठे गेला?

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने डॉ. सावंत यांच्या उलटीवरून राष्ट्रवादीला शालजोडे लगावले आहेत. पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे म्हणाले, अजित पवार यांच्यासारखा एक नेता अशा प्रकारचा अपमान कसे काय सहन करू शकतो हे आपल्याला कळत नाही. सत्तेसाठी एवढी लालसा अजित पवार यांच्या मनात असावी हे कधी वाटले नव्हते. त्यांच्यातील स्वाभिमानी वाणा कुठे हरपला आहे, याचा शोध राष्ट्रवादीतील पदाधिकाऱ्यांनी घेतला पाहिजे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT