'फक्त एक खून माफ करा...'! महिला दिनी रोहिणी खडसेंचे राष्ट्रपतींना पत्र Pudhari
मुंबई

'फक्त एक खून माफ करा...'! महिला दिनी रोहिणी खडसेंचे राष्ट्रपतींना पत्र

NCP Rohini Khadse |'म्हणून आम्हाला खुन करायचा आहे...'

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: देशभरातील महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांवरून शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहले आहे. या पत्राद्वारे रोहिणी खडसे यांनी 'आम्हाला एक खुन माफ करा' अशी मागणी आज (दि.८) राष्ट्रपतीकडे केली आहे. या पत्राची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

क्षमा मागून मागणी करतेय...; प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहले आहे. त्यांनी म्हटले आहे की, "महोदया, सर्वात प्रथम आपल्याला जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! आपला देश हा महात्मा बुद्ध आणि महात्मा गांधींचा देश म्हणून ओळखला जातो. जे शांतीचे अहिंसेचे मोठे प्रतीक आहे तरी आपली क्षमा मागून वरील मागणी करत आहे. कारणही तसेच आहे…

देशात महिला असुरक्षितच

आज देशात महिला मोठ्या प्रमाणात असुरक्षित आहेत. येणाऱ्या प्रत्येक दिवशी महिलांवरील अत्याचारांच्या घटनेत वाढ होत आहे. दोनच दिवसांपूर्वी पूर्वी देशाची आर्थिक राजधानी मुंबई येथे एका १२ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आले. राष्ट्रपती महोदया, १२ वर्षीय ! विचार करा काय परिस्थिती असेल ?

...त्यामुळे खुन माफ करा

नुकताच वर्ल्ड पॉपुलेशन रिव्यू सर्व्हे आला आहे अशा बातम्या आम्ही वाचल्या. या सर्व्हेमध्ये महिलांसाठी असुरक्षित असलेल्या जगातील विविध देशांचा उल्लेख केला आहे. या सर्व्हे नुसार आशिया खंडात भारत सर्वात असुरक्षित देश असल्याचे म्हटले गेले आहे. महिलांचे अपहरण, महिला बेपत्ता होण्याचे प्रकार, घरगुती हिंसाचार आणि अन्य गंभीर विषयांचाही समावेश आहे त्यामुळे आम्हाला एक खुन माफ करा अशी आम्ही समस्त महिलांच्या वतीने मागणी करतो.

होय, आम्हाला खुन करायचाय...

आम्हाला खुन करायचा आहे अत्याचारी मानसिकतेचा, बलात्कारी प्रवृत्तीचा, निष्क्रिय असलेल्या कायदा सुव्यवस्थेचा. महोदया, आपल्या राज्यावर, देशावर संकट आले म्हणून महाराणी ताराराणी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी तलवार उपसली होती मग आमचा समाज सुधारण्यासाठी आम्ही का मागे राहावे, असा प्रश्न देखील खडसे यांनी उपस्थित केला आहे. तसेच आमच्या मागणीचा यथोचित विचार करून आपण आमची मागणी मान्य कराल ही अपेक्षा करते. हीच तुमच्याकडून आम्हाला जागतिक महिला दिनाची भेट समजू, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर यांनी राष्ट्रपतींकडे मागणी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT