NCP, Sharad Pawar
शरद पवार file photo
मुंबई

शरद पवारांना 'पिपाणी'चा धसका

मोहन कारंडे

मुंबई : पिपाणी या चिन्हावर निवडणूक लढविलेल्या अपक्ष उमेदवारांना मिळालेली लक्षवेधी मते पाहून यापुढे तुतारी वाजविणारा मनुष्य या आपल्या निवडणूक चिन्हाशी साम्य असलेले पिपाणी हे चिन्ह अपक्ष उमेदवाराला देऊ नये, अथवा यादीतून वगळावे, अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाने केंद्रीय निवडणूक आयोगाला केली आहे. याबाबतचे पत्र राज्यातील मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयात न देता थेट दिल्ली कार्यालयात सादर केले आहे.

मतदारांनी तुतारी समजून पिपाणी चिन्हावर बटण दाबले

लोकसभेच्या सातारा मतदारसंघात शरद पवार यांनी विधान परिषद सदस्य शशिकांत शिंदे यांना उमेदवारी दिली होती. सातारा हा शरद पवार यांचा बालेकिल्ला असल्यामुळे शिंदे यांचा सहज विजय होईल, अशी पक्षाला खात्री होती. विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनीही परिश्रम घेतले. मतमोजणीत पुढे असल्याचे पाहून शिंदे समर्थकांनी विजयी मिरवणुकीची तयारी चालविली होती. मात्र या लढाईत भाजप उमेदवार उदयनराजे भोसले यांनी विजयश्री खेचून आणली. सुमारे ३८ हजार मतांच्या फरकाने भोसले विजयी झाले. त्यांच्या या विजयाला अपक्ष उमेदवाराने जणू हातभार लावला होता. पिपाणी चिन्हावर निवडणूक लढविलेल्या या अपक्ष उमेदवाराला ५० हजारपेक्षा अधिक मते मिळाली होती. मतदारांनी तुतारी समजून पिपाणी या चिन्हावर बटण दाबले.

पिपाणीवर लढलेल्या उमेदवाराला ५० हजारांहून अधिक मते

तर बीडमध्ये शरद पवार यांनी बजरंग सोनवणे यांना उमेदवारी दिली होती. भाजप उमेदवार पंकजा मुंडे यांच्याशी त्यांची लढत होती. मागील निवडणुकीत पंकजा यांच्या भगिनी प्रीतम यांनी बजरंग सोनवणे यांचा पराभव केला होता. त्यामुळे यंदा पंकजा बाजी मारतील असे चित्र होते. मात्र सोनवणे यांनी त्यांच्यावर मात केली. तरी पिपाणी चिन्हावर लढलेल्या उमेदवारानेही पन्नास हजारांहून अधिक मते घेतली होती.

पिपाणी चिन्हामुळे डोकेदुखी!

शरद पवार यांच्या पक्षाच्या उमेदवाराने निवडणूक लढविलेल्या अनेक मतदारसंघांत पिपाणी या चिन्हावर अपक्ष उमेदवार लढले होते. यामधील अनेक जणांनी ३० ते ४० हजार मते घेतली आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवार यांनी आपल्या पक्षाला मिळालेल्या मतांचा आढावा घेतला होता. यावेळी पिपाणी या चिन्हामुळे पक्षाचे नुकसान होत असल्याचे मत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी पवारांकडे व्यक्त केले होते.

SCROLL FOR NEXT