Rajya Sabha candidate | भुजबळ यांचा पत्ता कट; राजेंद्र जैन यांना संधी 
मुंबई

Rajya Sabha candidate | भुजबळ यांचा पत्ता कट; राजेंद्र जैन यांना संधी

राज्यसभेसाठी अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि नवनीत राणा यांसह विविध नावांवर खल झाल्यानंतर अखेर राष्ट्रवादी काँग्रेसने विदर्भातील राजेंद्र जैन यांना राज्यसभेची उमेदवारी बहाल केली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या या जागेसाठी १८ जून रोजी मतदान होणार आहे. देवगिरी बंगल्यावरील बैेठकीनंतर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जैन यांच्या नावाची घोषणा केली. यावेळी सुनेत्रा पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील उपस्थित होते.

दोन दिवसांपूर्वी मंत्री छगन भुजबळ यांनी खासदार पार्थ पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे भुजबळ यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीबाबत चर्चा केली होती. यात मंत्री भुजबळ यांनी राज्याच्या मंत्रिमंडळात रिक्त झालेल्या जागी पुतणे समीर भुजबळ यांना मंत्रीपद द्यावे तसेच येवला पोट निवडणुकीतही त्यांना उमेदवारी द्यावी अशी अट घातली होती. याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्लीत वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय कळविणार असल्याचे सांगितले होते. रविवारी दिवसभर मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून कोणताही निरोप आला नाही. रविवारी रात्री उशीरा पर्यंत चाललेल्या बैठकीत यावर चर्चा झाल्याचे समजते. भुजबळ यांच्या उमेदवारी व अटीवर बैठकीत कोणताही तोडगा निघाला नसल्याचे बोलले जात आहे. यानंतर पक्षाने राजेंद्र जैन यांना राष्ट्रवादी काँग्रेस कडून राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली असल्याची अधिकृत माहिती सुनील तटकरे यांनी दिली.

भुजबळ यांच्याबरोबरच अविनाश आदिक, प्रमोद हिंदूराव यांच्यासह अमरसिंह पंडितही जागेसाठी आग्रही होते. त्यातच भाजपच्या नेत्या, माजी खासदार नवनीत राणा यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्यानेही अनेक तर्कवितर्क लढविण्यात येत होते. बैठकीतील निर्णयाची माहिती देताना सुनील तटकरे म्हणाले की, दीर्घकाळ राष्ट्रवादीचे निष्ठावान असलेल्या जैन यांना संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

तटकरे, पटेल यांची नाराजी दूर

सुनेत्रा पवार राष्ट्रीय अध्यक्षा झाल्यानंतर त्यांनी निवडणूक आयोगाकडे केलेल्या पत्रव्यवहारानंतर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या पक्षातील महत्त्वाविषयी उलटसुलट चर्चा रंगल्या होत्या. मात्र, एकीकडे सुनील तटकरे यांच्या मुलाला विधान परिषदेची उमेदवारी आणि आता प्रफुल्ल पटेल यांचे कट्टर समर्थक राजेंद्र जैन यांना राज्यसभेची उमेदवारी देऊन या दोन्ही नेत्यांची नाराजी पक्षाने दूर केल्याची चर्चा आहे.

प्रफुल्ल पटेल यांचे समर्थक

गोंदिया जिल्ह्यातील राजेंद्र जैन हे प्रफुल्ल पटेल यांचे कट्टर समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे माजी आमदार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT