मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवीन कार्यकारिणीची यादी निवडणूक आयोगाला लवकरच पाठवण्यात येणार असून, यामध्ये राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष म्हणून खासदार सुनील तटकरे यांना पुन्हा स्थान दिले जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
यापूर्वी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याकडून निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलेल्या कार्यकारिणीत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या पदाचा उल्लेख नव्हता. तसेच, नवख्या लोकांना राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीत स्थान दिल्याने तटकरे आणि पटेल नाराज झाल्याची चर्चा होती.
मुश्रीफ यांना संधीची शक्यता
या पार्श्वभूमीवर, आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून कार्यकारिणीची सुधारित नवी यादी निवडणूक आयोगाला पाठवली जाणार आहे. नव्या कार्यकारिणीत नवाब मलिक यांची मुलगी सना मलिक यांच्याऐवजी हसन मुश्रीफ यांना स्थान मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर सुबोध मोहिते आणि प्रजापती यांनाही कार्यकारिणीतून वगळले जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
भाजप सन्मान राखेल, राष्ट्रवादीला अर्थ खाते मिळेल : मंत्री मुश्रीफ
यासंदर्भात पत्रकारांशी कोल्हापुरात बोलताना वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, अर्थ खाते हे आमच्या पक्षाकडे होते. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर बजेटमुळे हे खाते नंतर देतो, असे सांगितले होते. दिल्लीत याबाबतचा निर्णय होईल. भाजप सन्मान राखेल आणि हे खाते राष्ट्रवादीला मिळेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीला मी उपस्थित होतो. या बैठकीत उपस्थित पक्षाच्या सर्व नेत्यांसह खासदार व आमदारांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीनंतर आपल्याला ‘व्हिलन’ ठरवण्यात आल्याच्या भावना आणि आपल्याला टार्गेट केल्याची खंत खा. तटकरे यांनी बैठकीत व्यक्त केली होती. प्रफुल्ल पटेल हे काही कामानिमित्त बैठकीला अनुपस्थित होते. यामुळे राष्ट्रवादी पक्षातील हे पेल्यातील वादळ पेल्यामध्येच संपलेले आहे. संपूर्ण पक्ष एकसंधच आहे, असे मुश्रीफ यांनी सांगितले.