मुंबई : मृणालिनी नानिवडेकर
अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर पक्षातील काही निर्णय मार्गी लावणे आवश्यक असल्याने लवकरात लवकर विधिमंडळ पक्षाची बैठक घ्यायला हवी अशी माहिती सुनेत्रा पवार यांच्या कानावर घालण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांनी गुरुवारी बारामती येथे सुनेत्रा पवार यांना या प्रक्रियेची माहिती दिली, असे समजते. पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ यांनी आज सुनेत्रा पवार यांना यासंबंधीचा तपशील सांगितला असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून कळते.
अजितदादा यांच्या अकाली निधनामुळे आमदार, कार्यकर्ते धक्क्यात आहेत. तथापि, काही तरतुदी पूर्ण कराव्या लागतील. हा घटनाक्रम आवश्यक भाग असतो, असे या दोन्ही नेत्यांनी सुनेत्रावहिनी यांच्या कानावर घातल्याचे समजते. अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होण्यापूर्वी त्यांच्या गटाची छोटी अनौपचारिक बैठक बारामती येथेच पार पडली. या बैठकीत पुढे काय, यावर प्रारंभिक चर्चा झाली. विधिमंडळ पक्षाचा नेता निवडावा लागेल, त्या संदर्भातील हालचाली लवकरच सुरू कराव्या लागतील, असे या बैठकीत ज्येष्ठ नेत्यांनी लक्षात आणून दिले.
प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात परतून सक्रिय व्हावे काय, यावरही एका गटात चर्चा झाली. मात्र, अजितदादांच्या काही निकटवर्ती आमदारांचा त्यांना विरोध असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे हे प्रश्न नंतर सोडवता येतील, प्रथमत: विधिमंडळपक्षनेत्याची निवड करायला हवी, असे प्रफुल्ल पटेल यांनी सहकाऱ्यांच्या लक्षात आणून दिल्याचे समजते. यासंदर्भातील कायदेशीर तरतुदींचा थोडक्यात आढावा घेतल्यानंतर पटेल आणि भुजबळ हे सुनेत्रा पवार यांना भेटले. काही वर्षांपासून त्या सक्रिय राजकारणात आहेत. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर त्या राज्यसभेवर निवडून गेल्या.
त्यामुळे आमदारांची भावना लक्षात घेता पक्षाचे अध्यक्षपद त्यांनी स्वीकारावे अशी विनंतीही या दोघांनी केली आहे. ही वेळ अशा चर्चा सुरू करायची नाही याची आम्हाला जाणीव आहे, दादांचे जाणे चटका लावणारे आहे. तथापि, कायदेशीर बाबी आणि संघटनात्मक तरतुदींकडे लक्ष देण्यासाठी ही बैठक आवश्यक ठरेल असेही सुनेत्रा पवार यांच्या कानावर घालण्यात आल्याचे कळते. यासंदर्भात त्यांनी लगेच कोणतीही प्रतिक्रिया दिली नसून, प्रत्येकाचे म्हणणे त्या ऐकून घेत असल्याचेही सांगण्यात येते. संसदेचे अधिवेशन सुरू असल्यामुळे लवकरच खासदार सुप्रिया सुळे दिल्लीला रवाना होणार असल्याची शक्यताही व्यक्त होत आहे. अजित पवार गटाने अजून शरद पवार गटाशी अजितदादांच्या निधनानंतर विलीनीकरणावर कोणतीही औपचारिक चर्चा सुरू केली नसल्याचेही सांगितले जाते आहे. भाजपही घडामोडींवर लक्ष ठेवून आहे.
शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी जयंत पाटील यांच्यासमवेत सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. मात्र, या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नव्हती, ती सांत्वनपर भेट होती असे सांगितले जात आहे. यानंतर माध्यमांशी बोलताना शशिकांत शिंदे यांनी दोन्ही पक्षांचे विलीनीकरण व्हावे यावर भर दिला जाणार असल्याचे सांगितले. पुणे येथील शरद पवार यांचे निकटवर्तीय अंकुश काकडे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे की, 12 डिसेंबर रोजी पवार साहेबांच्या वाढदिवसालाच विलीनीकरण प्रत्यक्षात येणार होते. अजित दादा पवार यांची तशीच इच्छा होती. या विधानानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस कधी एकत्र येणार या चर्चेने जोर पकडला.