मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मतभेद उफाळले आहेत. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मराठ्यांना ओबीसी आरक्षणात समाविष्ट करू नये, अशी भूमिका घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना कानउघाडणी केली आहे. तर पक्षाचे वरिष्ठ नेते प्रफुल पटेल यांनी मात्र भुजबळ यांच्या भूमिकेला पाठिंबा दिल्याने पक्षात दुफळी निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाच्या समर्थनार्थ ठाम भूमिका घेतली असून, त्यांनी म्हटले आहे की ओबीसींचे हक्क कुणालाही देऊ नयेत. या भूमिकेमुळे अजित पवार नाराज झाले असून, त्यांनी भुजबळ यांना कडक शब्दांत टोकले आहे. तथापि, भुजबळ यांच्या भूमिकेला ओबीसी समाजाचा वाढता पाठिंबा पाहता प्रफुल पटेल यांनी त्यांच्या बाजूने उभे राहत म्हटले की, “भुजबळ नेहमीच ओबीसींच्या बाजूने बोलले आहेत, यात काही नवीन नाही.”
यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडलेले दिसत आहेत – एक मराठा आरक्षण समर्थक आणि दुसरा ओबीसी आरक्षणाच्या बाजूने ठाम. मराठ्यांचे समर्थन करायचे की ओबीसी समाजाला आपल्या बाजूला ठेवायचे, असा प्रश्न आता राष्ट्रवादी नेतृत्वासमोर उभा ठाकला आहे.
मराठा समाज प्रामुख्याने महाराष्ट्रापुरता मर्यादित असताना ओबीसी समाजाचा विस्तार संपूर्ण देशभर आहे. त्यामुळे प्रफुल पटेल यांनी ओबीसींचा आधार राखण्यासाठी सोयीची भूमिका घेतल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. दरम्यान, दिल्ली येथे भुजबळ यांनी घेतलेल्या ओबीसी मेळाव्याला मिळालेला मोठा प्रतिसाद पाहता प्रफुल पटेल यांनी यू-टर्न घेतल्याचे स्पष्ट दिसून आले आहे.