Sunetra Pawar Pudhari
मुंबई

NCP politics | राष्ट्रवादी काँग्रेस शोधत आहे महाराष्ट्र सरकारमधला ‘अर्थ’

पुढारी वृत्तसेवा

मृणालिनी नानिवडेकर

मुंबई : सुनेत्रा पवार यांचा शपथविधी झाला आणि त्यांना मानाचे उपमुख्यमंत्रिपद मिळाले. त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या. विक्रमी मतांनी बारामती विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीत विजयी झाल्या. आता राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देऊन त्या पूर्ण वेळ राज्याच्या सेवेत स्वतःला झोकून देणार आहेत. मात्र, त्यावेळेला न मिळालेले अर्थ खाते आता तरी त्यांना मिळायला हवे, अशी कुजबुज राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात सुरू झाली आहे.

तीन महिन्यांपर्यंत खात्याबद्दल काही बोलू नये, त्याबद्दलचा निर्णय नंतर घेतला जाईल, असे ठरले होते. मात्र, आता कोणतीही हालचाल होत नसल्याने हा विषय आता मांडला पाहिजे, अशी चर्चा सुरू झाली आहे. दुसरीकडे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना सुनेत्रा पवार आणि अजित पवार यांच्या कार्याबद्दल पूर्ण सहानुभूती असली, तरी अर्थ खात्याचा कारभार सांभाळण्याची क्षमता आजतरी राष्ट्रवादीत कुणाकडे नसल्याने खाते देता येणार नाही, असे वाटते आहे.

अर्थ खाते पूर्वी तीन पक्ष असलेल्या युती सरकारमध्ये ताणाचा विषय ठरले होते. आता तसे पुन्हा होणार नाही ना; ही चिंता नेत्यांना भेडसावते आहे. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होऊन तीन महिने पूर्ण झाले आहेत. निदान महत्त्वाचे खाते केव्हा दिले जाईल याची चर्चा अनौपचारिकरीत्या तरी व्हायला हवी, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मांडली जाते आहे.

तीन पक्ष सरकारमध्ये असताना हे खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वगळता कुणीही सांभाळू शकत नाही, अशी स्थिती असल्याचे भाजपने लक्षात आणून देण्याचे ठरवले आहे. दिलीप वळसे-पाटील प्रकृतीच्या कारणामुळे या खात्याची जबाबदारी घेऊ शकत नाहीत, त्यामुळे हे खाते देणार कुणाला हा प्रश्न आहे, असे सरकारमधील एका महत्त्वाच्या व्यक्तीने सांगितले. जयंत पाटील यांनी पक्ष प्रवेश केला असता, तर खाते मागता आले असते, असेही बोलले जाते.

राष्ट्रवादीत कोणी अर्थ खाते सांभाळेल असे भाजप धुरिणांना वाटत नाही

अर्थसारखे महत्त्वाचे खाते राष्ट्रवादी काँग्रेसला मिळेल का, याबद्दल शंका आहे असे एका ज्येष्ठ नेत्याने ‘पुढारी’शी बोलताना मान्य केले. पक्ष नेत्यांनाच याबद्दल पुरेसा विश्वास नसल्यामुळे मंत्रिमंडळातला ‘अर्थ’ शोधायचा तरी कसा, हा प्रश्न सर्व संबंधितांना पडला असल्याचे समजते. त्यातच भारतीय जनता पक्षातील धुरिणांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील कोणीही सध्या अर्थ खात्याची जबाबदारी सांभाळू शकत नाही, असे वाटते आहे.

...मग महसूल द्या

अर्थ खाते देणे शक्य नसेल तर निदान महसूल खाते द्या, अशी मागणी करायची काय यावर अजित पवार राष्ट्रवादीत विचार सुरू असल्याचे समजते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT