मुंबई : पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत आघाडी केल्यानंतर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाने जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आघाडी केली आहे. सोलापूर, सातारा, सांगली, पुणे, परभणी जिल्हा परिषदेमध्ये या दोन्ही पक्षांनी मैत्रीचा हात पुढे केला आहे.
राज्यातील महानगरपालिका निवडणुकांवेळी महायुतीमधील भाजपाने आपल्यासोबत सत्तेत असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेतले नाही. त्यामुळे आपला बालेकिल्ला राखण्यासाठी अजित पवार यांनी अनपेक्षितपणे पुणे व पिंपरी -चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी केली. मात्र, घड्याळ या निवडणूक चिन्हावर शरद पवार यांच्या पक्षानेही निवडणूक लढवावी, असा आग्रह धरण्यात आला होता. परंतु, या आग्रहाला शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी प्रतिसाद दिला नाही. अखेर अनपेक्षितपणे झालेली आघाडी तुटण्याची शक्यता निर्माण झाली होती.
आघाडी तुटल्यास आपण भाजपाला टक्कर देऊ शकत नाही, अशी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी स्पष्ट भूमिका घेतल्यानंतर अजित पवार यांनी घड्याळाचा आग्रह सोडून दिला. त्यामुळे शरद पवार गटाने आघाडीला सहमती दर्शवली. भाजपासह दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे शिंदे गट आणि उबाठा शिवसेनेसोबतही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे अल्पकालीन राजकीय वैर निर्माण झाले आहे. परभणीमध्ये उबाठा गटाचे संजय जाधव (बंडू) खासदार आहेत.
जाधव यांच्या प्रभावामुळे उबाठा गट जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये परभणीमध्ये उसळी मारू शकतो. हे गृहीत धरून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने परभणीमध्ये एकत्र निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.
पश्चिम महाराष्ट्रालाही पाडले खिंडार
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत भाजपाने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा धुव्वा उडवला. या पराभवाने सावध झालेल्या अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी हा धक्कादायक पराभव टाळण्यासाठी आता जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये आघाडी केली आहे. पश्चिम महाराष्ट्र शरद पवार यांचा बालेकिल्ला असला तरी या बालेकिल्ल्यालाही आता अजित पवार यांनी खिंडार पाडले आहे. असे असले तरी शरद पवार यांना मानणाराही मोठा वर्ग आहे. या वर्गाला सोबत घेतल्यास जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये चमत्कार घडेल, अशी अपेक्षा अजित पवार यांना वाटत आहे.