Mumbai Cocaine Seizure Pudhari
मुंबई

Mumbai Cocaine Seizure: मुंबईत १,७४५ कोटींच्या कोकेनचा मोठा साठा जप्त; NCB ने उघड केलं आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेट

Mumbai Cocaine Seizure: नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने मुंबईत मोठी कारवाई करत ३४९ किलो कोकेन जप्त केले आहे. या ड्रग्जची किंमत सुमारे १,७४५ कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

पुढारी वृत्तसेवा

Mumbai Cocaine Seizure: देशातील अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने मुंबईत तब्बल ३४९ किलो कोकेन जप्त केले आहे. या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे १,७४५ कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. या कारवाईमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या मोठ्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या कारवाईबद्दल एनसीबीच्या पथकाचे कौतुक केले आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी म्हटले की, “देशातील नार्कोटिक्स कार्टेल पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. मुंबईत ३४९ किलोचे कोकेन जप्त करून एनसीबीने मोठे यश मिळवले आहे.”

मिळालेल्या माहितीनुसार, एनसीबीने ड्रग्ज बाबत तपास सुरू केला होता. त्या तपासातून अनेक धागेदोरे मिळाले आणि त्यानंतर तपास यंत्रणांनी मोठे नेटवर्क उघड केले. तपास पुढे नेत अधिकाऱ्यांनी मुंबईतील विविध ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत मोठ्या प्रमाणावर कोकेन जप्त करण्यात आले.

अधिकाऱ्यांच्या मते, जप्त करण्यात आलेले कोकेन अत्यंत उच्च दर्जाचे असून ते आंतरराष्ट्रीय बाजारात मोठ्या प्रमाणावर विकले जाणार होते. या प्रकरणात काही संशयितांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. मात्र तपास सुरू असल्याने अधिक तपशील अद्याप जाहीर करण्यात आलेले नाहीत.

एनसीबीच्या या कारवाईकडे मोठे यश म्हणून पाहिले जात आहे. गेल्या काही वर्षांत मुंबईसह देशातील अनेक शहरांमध्ये ड्रग्ज तस्करीची प्रकरणे वाढताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.

दरम्यान, या प्रकरणाचा संबंध आंतरराष्ट्रीय ड्रग्ज सिंडिकेटशी असल्याची शक्यता तपास यंत्रणा तपासत आहेत. कोकेन भारतात कशा मार्गाने आणले गेले, त्यामागे कोणते नेटवर्क कार्यरत होते आणि याचा संबंध परदेशातील कोणत्या गटांशी आहे, याचा तपास आता अधिक वेगाने सुरू आहे.

एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, अंमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात अशाच प्रकारच्या कठोर कारवाया पुढेही सुरू राहतील. सरकार आणि तपास यंत्रणा देशातील ड्रग्ज नेटवर्क मोडून काढण्यासाठी आक्रमक पावले उचलत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT