मुंबई : पुढारी वृत्तसेवा
मुंबई आणि नवी मुंबईसह महाराष्ट्रात अमली पदार्थांचे नेटवर्क चालविल्याचा आरोप असलेल्या नवीन गुरुनाथ चिचकर याला नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) वर्षभर स्थानबद्ध केले आहे. त्यानुसार चिचकरला पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहातून चेन्नईतील पुझल मध्यवर्ती कारागृहात हलविण्यात आले आहे.
एनसीबीच्या माहितीनुसार, त्याच्या कथित आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ नेटवर्कवर अंकुश ठेवण्यासाठी ही कारवाई करण्यात आली. एनसीबीच्या तपासानुसार, चिचकरचे नाव २०२१ मधील अमली पदार्थांच्या प्रकरणात समोर आले होते.
या प्रकरणांनंतर तो भारताबाहेर गेला असावा. फरारीच्या काळात त्याचे थायलंड, मलेशिया, हाँगकाँग, संयुक्त अरब अमिराती आणि व्हानुआतू या देशांतील ड्रग्ज तस्करांशी संबंध आल्याचे तपासात समोर आले आहे. परदेशात असताना भारतातील अमली पदार्थांच्या तस्करीचे व्यवहार तो नियंत्रित करत होता. त्यामुळे त्याला केवळ नियमित गुन्हेगारी कारवाईत ठेवण्याऐवजी प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेचा निर्णय घेण्यात आला.
नवी मुंबईचा रहिवासी असलेला उच्चशिक्षित नवीन चिचकर अचानक ड्रग्ज तस्कर कसा बनला हा शोधाचा विषय झाला आहे. नवीन उच्च शिक्षणासाठी लंडनला गेला, तिथे त्याने गुन्हेगारीचे मानसशास्त्र तसेच चित्रपट आणि दूरचित्रवाणीचा अभ्यास केला. याच दरम्यान तब्बल ११२८ कोटींचे ड्रग्ज रॅकेट मुंबई एनसीबीने २०२५ साली उघडकीस आणले. या रॅकेटचा सूत्रधार म्हणून नवीन चिचकरचे नाव तेव्हा पुढे आले.
कोकेन अन् अमली पदार्थांची तस्करी : परदेशातून भारतात कोकेन आणि इतर अमली पदार्थ पाठविण्यासाठी विविध मार्गांचा वापर चिचकरने केल्याचे तपासात निष्पन्न झाले.
इंटरपोल रेड नोटीस : भारताबाहेर असताना चिचकरविरोधात इंटरपोल रेड नोटीस जारी करताच त्याचा ठावठिकाणा मलेशियात लागला आणि त्याला भारतात आणण्यात आले.
४१.६४ लाखांची मालमत्ता गोठवली : चिचकरने अमली पदार्थ तस्करीतून मिळालेल्या पैशांचा वापर मालमत्ता खरेदीसाठी झाल्याचा संशय आहे. यापूर्वी त्याची ४१.६४ लाख रुपयांची मालमत्ता एनसीबीने गोठवली.