मुंबई: नवी मुंबई महापालिकेच्या वाशी येथील प्रभाग क्र. 17-अमधील निवडणुकीला गुरुवारी उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने आपल्या अधिकारांचा बेकायदेशीररित्या आणि मनमानीपणे वापर केल्याचे मत व्यक्त करीत मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम ए. अंखड यांच्या खंडपीठाने याचिकेवर सुनावणी घेण्यास काहीही हरकत नाही, असे निरीक्षण नोंदवत याचिकेवर उद्या शुक्रवारी सुनावणी घेण्याचे निश्चित केले.
भाजपचे उमेदवार निलेश भोजने यांनी दाखल केलेल्या याचिकेवर गुरुवारी मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम ए. अंखड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. भोजने यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज फेटाळणाऱ्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या आदेशाला स्थगिती देण्याची विनंती याचिकेतून केली. तसेच याचिकेवरील अंतिम निकालापर्यंत प्रभाग क्रमांक 17-अ च्या नगरसेवकपदाच्या निवडणुकीला स्थगिती देण्याची मागणी केली होती. त्याची नोंद घेत खंडपीठाने प्राथमिक सुनावणीवेळीच निवडणुकीला स्थगिती दिली. त्यामुळे याचिकाकर्ते भोजने यांना अंतरिम दिलासा मिळाला आहे.
भोजने यांचा उमेदवारी अर्ज शिवसेना जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांच्या तक्रारीवरून फेटाळण्यात आला होता. भोजने यांनी अनधिकृत बांधकाम केल्याचा आरोप पाटकर यांनी केला होता. सुनावणीवेळी भोजने यांच्यावतीने ज्येष्ठ वकील नवरोज सेरवई यांनी युक्तिवाद केला. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा आदेश प्रथमदर्शनी बेकायदेशीर असल्याने तो रद्द केला पाहिजे, असा दावा सेरवाई यांनी केला. त्यावर राज्य निवडणूक आयोगाला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश देत खंडपीठाने गुरुवारी पुढील सुनावणी निश्चित केली.
राज्य निवडणूक आयोग, नवी मुंबई महापालिका आयुक्त, मुख्य निवडणूक अधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांनी प्रभाग क्रमांक 17अच्या नगरसेवक पदाच्या निवडणुकीसंदर्भात पुढील कोणतीही कार्यवाही करू नये, असे खंडपीठाने यावेळी स्पष्ट केले.