नवी मुंबई : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील मतदारयादीतील दुबार नावे वगळण्याच्या मागणीचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देताना काँग्रेसचे पदाधिकारी.  (छाया : सुमित रेणोसे)
मुंबई

Voter list issue : नवी मुंबईतील मतदार यादीत तब्बल 76 हजार दुबार नावे

ऐरोलीत 41, 556 तर बेलापूर मतदारसंघात 35 हजार दुबार मतदार

पुढारी वृत्तसेवा

नवी मुंबई : नवी मुंबईतील मतदारयादीत 76 हजार दुबार नावे असून महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नावे वगळण्याची मागणी काँग्रेसचे नवी मुंबई जिल्हा प्रवक्ते रवींद्र सावंत यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे एका निवेदनातून केली आहे.

नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील ऐरोली व बेलापूर विधानसभा मतदारसंघातील मतदारयाद्या सदोष असल्याने निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवरच गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात दोन्ही विधानसभा मतदारसंघात जवळपास 76 हजारांहून अधिक दुबार नावे आहेत.

ऐरोली विधानसभा मतदारसंघात 41,556 दुबार नावे तर बेलापूर विधानसभा मतदारसंघात 35 हजाराच्या आसपास दुबार नावे आहेत. विशेष म्हणजे ऐरोलीतही तीच नावे व बेलापुरातही तीच नावे आहेत. म्हणजेच सकाळी एकीकडे मतदान करा व दुपारनंतर दुसरीकडे मतदान करा, असा प्रकार होत असल्याचा दाट संशय आहे.

इतकेच नाही तर एकाच नोडमध्ये वेगवेगळ्या मतदारसंघातही तीच तीच नावे दोन ते तीन वेळा पहावयास मिळतात. नजरचुकीने म्हटल्यास शंभर-दोनशे, फारफार तर हजार पाचशे मतांचा गोंधळ होऊ शकतो. परंतु 76 हजार मतांपेक्षा अधिक घोळ हे नियोजित षडयंत्र आहे. दुबार नावे मतदारयादीत घुसवून आपले राजकीय वर्चस्व कायम ठेवण्याची ही खेळी आहे व त्यासाठीच प्रशासकीय यंत्रणेचा दुरुपयोग केला जात असल्याचा संशय रवींद्र सावंत यांनी निवेदनात व्यक्त केला आहे.

रवींद्र सावंत यांनी नवी मुंबईतील 76 हजाराहून अधिक दुबार नावे वगळण्याची मागणी करताना निवेदन सादर केले. त्यावेळी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते संतोष शेट्टी ,अनवर हवलदार, संतोष सुतार,बाबासाहेब गायकवाड, शांताराम शेट्टी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

ग्रामीण भागातील मतदारही घुसडले

दोन वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघातच नाही तर मनपाच्या शेजारच्या मतदारसंघातही दुबार नावांचा घोळ आहे. ग्रामीण मतदारही येथील मतदारयाद्यांमध्ये घुसडले आहेत.याबाबत सर्व पुरावे सादर करत आहोत.

आपणही याप्रकरणी चौकशीचे निर्देश देणे आवश्यक आहे. कारण निवडणुकीत याचा गैरवापर होण्याची शक्यता आहे. यामुळे निवडणूक आयोगाच्या कार्यक्षमतेवर, पारदर्शकतेवर व प्रामाणिकपणावर संशय निर्माण झाला आहे. ही दुबार मतदार नावे मनपा निवडणुकीच्या अगोदर वगळण्यात यावीत, तसे आपण संबंधितांना निर्देश देवून सुधारीत मतदारयादी उपलब्ध करावी, अशी मागणी रवींद्र सावंत यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT