Shahbaz Village, Belapur
शाहबाज - महापालिकेने नोटीस बजावली तर रिकामी केली नाही Pudhari
मुंबई

Navi Mumbai | शाहबाज घटना : इमारत अनधिकृत, महापालिकेने नोटीस बजावली तरी रिकामी केली नाही

पुढारी वृत्तसेवा

नवी मुंबई - महानगरपालिका क्षेत्रात शहाबाज गाव, सेक्टर १९, बेलापूर येथे आज सकाळी इंदिरा निवास ही तळमजला अधिक ४ मजली इमारत कोसळली. या इमारतीतून ३७ प्रौढ आणि १३ मुले सुरक्षित बाहेर आहेत. ही इमारत अनधिकृत बांधण्यात आली होती. महापालिका अतिक्रमण विभागाने नोटीस बजावली असून खाली करण्याची सूचना जूनमध्ये दिल्याचे महापालिकेने सांगितले.

आज शनिवारी पहाटे ४.४५ वाजता शाहबाज गावात इमारत कोसळली. त्यानुसार लगेच नवी मुंबई महानगरपालिकेचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि बचाव कार्याला सुरुवात करण्यात आली. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे तत्परतेने घटनास्थळी दाखल झाले. एनडीआरएफच्या टीमलाही पाचारण करण्यात आले.

इमारतीमध्ये एकूण ३ दुकाने आणि १२७ घरे (फ्लॅट) होती. ही इमारत महापालिका यादीतील अनधिकृत बांधकाम केलेली इमारत आहे. महापालिका अतिक्रमण विभागाने या इमारतीला नोटीस बजावून रिकामी करण्याच्या सूचना दिल्या. मात्र तरी रहिवाशांनी इमारत खाली केली नाही. अखेर शनिवारी पहाटे ही अनधिकृत इमारत पडली. बाहेर काढलेल्यांसाठी निवाऱ्याची व खाण्याची व्यवस्था महानगरपालिका निवारा केंद्रात करण्यात आली आहे.

एनडीआरएफ टीम - अग्निशमन दल यांचे बचावकार्य

घटनेची माहिती मिळताच महानगरपालिकेचे अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी तातडीने ढिगाऱ्याखाली दिसत असलेल्या २ माणसांना बाहेर काढले. त्यांना महापालिका रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती स्थिर आहे. सध्या एनडीआरएफ टीम व अग्निशमन दल यांच्या मदतीने ढिगारा उपासण्याचे काम सुरू आहे.

शाहबाज घटना : ३७ प्रौढ आणि १३ मुले सुरक्षित

महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार, सर्व मदत यंत्रणा सक्रीय आहेत. ढिगारा उपसण्याच्या कामात रेस्क्यू केलेल्या एका व्यक्तीला नमुंमपा वाशी रुग्णालय या ठिकाणी पाठविण्यात आलेले होते. सदर व्यक्ती मृत असल्याचे घोषित करण्यात आले आहे. आणखी एक व्यक्ती ढिगाऱ्याखाली अडकलेला असून रेस्क्यू कार्यवाही सुरू आहे.

SCROLL FOR NEXT