नवी मुंबई: नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या आकडेवारीनुसार शहरात वाहन खरेदीत लक्षणीय वाढ झाली असून, यामुळे आरटीओच्या महसुलातही मोठी भर पडली आहे. वाढती लोकसंख्या, औद्योगिकीकरण आणि दळणवळणाच्या सुविधा यामुळे नागरिकांचा खासगी वाहनांकडे ओढा वाढत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 या कालावधीत 40 हजार 199 वाहनांची नोंदणी झाली होती. यामधून 392 कोटी 48 लाख रुपयांचा महसूल प्राप्त झाला होता. तर 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 या कालावधीत तब्बल 48 हजार 196 वाहनांची नोंद झाली असून, महसूल 426 कोटी 34 लाख रुपयांपर्यंत पोहोचला आहे. यावरून केवळ शहरातील वाहनसंख्येतच नव्हे, तर आरटीओच्या महसुलातही मोठी वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
नवी मुंबईत 2004 पासून आतापर्यंत सुमारे 7 लाख 61 हजारांहून अधिक वाहनांची नोंदणी झाली आहे. सध्या शहराची लोकसंख्या 18 लाखांच्या आसपास पोहोचली असून, त्याच प्रमाणात वाहनसंख्याही वाढत आहे. ‘स्मार्ट सिटी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईत वाढते औद्योगिकीकरण आणि विस्तारणारे रस्ते जाळे यामुळे खासगी वाहनांचा वापर अधिक वाढला आहे.
रेल्वे, बेस्ट, एनएमएमटी, रिक्षा असे सार्वजनिक वाहतुकीचे पर्याय उपलब्ध असतानाही, नागरिक मोठ्या प्रमाणावर खासगी वाहनांना पसंती देत आहेत. पनवेल, ठाणे, मुंबई, कल्याण-डोंबिवली, बदलापूर या भागांमधून नोकरी व व्यवसायासाठी दररोज मोठ्या प्रमाणावर नागरिक नवी मुंबईत ये-जा करतात. मात्र, सार्वजनिक वाहतुकीतील अपुऱ्या सुविधा आणि गर्दीमुळे अनेकजण स्वतःची वाहने वापरणे अधिक सोयीचे मानत आहेत.
याशिवाय, वाहन खरेदीसाठी सुलभ कर्जव्यवस्था, आकर्षक ऑफर्स आणि वाढती क्रयशक्ती यामुळेही वाहन खरेदीत वाढ होत आहे. शहरातील रस्त्यांवर दुचाकी, चारचाकी, ऑटो रिक्षा तसेच खाजगी टुरिस्ट बसेस यांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे.
नवी मुंबईमध्ये वाहननोंदणीमध्ये सातत्याने वाढ होत असून, यामागे शहराचा वेगाने होत असलेला विकास ही प्रमुख कारणे आहेत. सुलभ कर्जप्रणालीमुळे वाहन खरेदी करणे सोपे झाले आहे. तसेच शहरातील दळणवळणाच्या गरजांमुळे खासगी वाहनांचा वापर वाढत आहे. वाहनसंख्या वाढत असताना रस्ते सुरक्षा, वाहतूक शिस्त आणि प्रदूषण नियंत्रण यावरही आम्ही विशेष भर देत आहोत. नागरिकांनी नियमांचे पालन करून सुरक्षित वाहनचालना करणे अत्यंत आवश्यक आहे.- गजानन गावंडे, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, नवी मुंबई