Water And Power Crisis Pudhari
मुंबई

Water And Power Crisis: विजेचा लपंडाव, गढूळ पाण्‍याने नवी मुंबईकर त्रस्‍त

तुर्भे, घणसोली, कोपरखैरणेपाठोपाठ उलवेमध्ये वारंवार वीजपुरवठा खंडित

पुढारी वृत्तसेवा

नवी मुंबई: नवी मुंबईकर सध्‍या गढूळ पाणी आणि विजेचा लपंडावामुळे भयंकर त्रस्‍त आहेत. महापालिका शुद्ध पाण्‍याचा दावा करीत असली तरी नळाला येणारे पहिल्‍या धारेचे पाणी पाहून नवी मुंबईकरांच्‍या तोंडचे पाणी पळाले आहे. त्‍यात वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. तुर्भेगाव, कोपरखैरणे, घणसोलीपाठोपाठ आता उलवे सेक्टर-८ परिसरात वीज समस्येमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

उलवेतील एका महिलेने समाजमाध्‍यमांवर प्रसारित केलेला भावनिक व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या व्हिडीओमध्ये तिने वीजपुरवठ्याच्या समस्येमुळे नागरिकांना होत असलेल्या हालअपेष्टांची व्यथा मांडली आहे, तर नवी मुंबईकर विरूद्ध प्रशासन असा एक फेक संवादही प्रसारित झाला असून त्‍यात नवी मुंबईकरांच्‍या व्‍यथा मांडल्‍या आहेत.

महिनाभर नवी मुंबईकर अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे त्रस्‍त आहेत. महापालिका प्रशासनाने पाण्‍याचे नमुने घेत शुद्ध पाणीपुरवठा होत असल्‍याचा दावा केला आहे, तर महापौरांनीही माेरबे धरणासह विभाग कार्यालयात भेटीचा धडाका लावला आहे.

मात्र गढूळ पाणी ही समस्‍या काही सुटलेली नाही. घणसोलीत परिसरात याचा सध्‍या मोठा फटका बसला आहे. नळाला येणारे पाणी सांडपाण्‍यासारखे काळेकुट्ट येत आहे. त्‍यामुळे ही काळ्‍या पाण्‍याची शिक्षा आम्‍हाला का, असा प्रश्‍न घणसोलीतील मेघमल्‍हार संकुलातील नागरिकांनी उपस्‍थित केला आहे.

गेल्या आठवड्यात तूर्भेगाव, माथाडी कामगार राहत असलेली वसाहत आणि परिसरात विद्युत पुरवठा खंडित होत होता. भाजपच्या नगरसेविका शुभांगी पाटील यांनी विद्युत अभियंत्यांना धारेवर धरत जाब विचारत वेळ पडल्यास अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा दिला होता. या घटनेला चार दिवस उलटत नाहीत तोच कोपरखैरणे, घणसोली आणि आता उलवे नोडमध्ये वीजपुरवठा खंडित होत आहे.

नवी मुंबईतील उलवे सेक्टर-८ येथे राहणाऱ्या एका नोकरदार महिलेने सोशल मीडियावर भावनिक व्हिडीओ पोस्ट करत परिसरातील वीजपुरवठा समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. महिलेच्या म्हणण्यानुसार, गेल्या आठवडाभरापासून परिसरात वारंवार आणि दीर्घकाळ वीज पुरवठा खंडित होत आहे. अनेकदा पहाटे ४ ते ५ वाजेपर्यंत वीजपुरवठा सुरळीत होत नाही. त्‍यामुळेे अनेक दिवस नीट झोपल्‍याचे आठवत नाही अशी तिने खंत व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT