Navi Mumbai Rent: Pudhari
मुंबई

Navi Mumbai Rent: नवी मुंबईत घर भाड्याने घेणेही परवडेना! दरात 30% पर्यंत वाढ

वाशी, नेरुळ, सीवूडमध्ये भाडे गगनाला भिडले; सर्वसामान्यांचे जगणे कठीण

पुढारी वृत्तसेवा

नवी मुंबई : मुंबईला पर्याय म्हणून 70 च्या दशकात नवी मुंबई शहर वसवण्यात आले. सिडकोने निर्माण केलेल्या या शहरात आज घर भाड्याने घेणेही सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहिलेले नाही. घर विकत घेणे परवडत नसल्याने आजमितीस हजारो नागरिक भाड्याच्या घरांत वास्तव्य करीत आहेत. परंतु आता घराप्रमाणेच नवी मुंबईतील वाणिज्य व निवासी जागांच्या भाड्याचे दर अव्वाच्या सव्वा वाढले आहेत.

सिडको महामंडळाने मालमत्तांचे दर निश्चित केले असले, तरी बांधकाम व्यावसायिक मनमानी पद्धतीने प्रति चौरस फूट दर आकारत असल्याने स्वत:च्या मालकीचे घर घेणे सामान्यांसाठी स्वप्नच ठरत आहे. यामुळे भाड्याचे घर घेण्याचा पर्याय स्वीकारला जात आहे. नवी मुंबईच्या होणाऱ्या विकासामुळे मागील काही महिन्यांपासून घरमालकांनी भाडे दरामध्ये 25 ते 30 टक्के वाढ केल्यामुळे परवडेल असे घर शोधण्यासाठी सामान्यांना वणवण भटकावे लागत आहे. घणसोली, वाशी, पाम बीच, नेरुळ, ऐरोली व सीवूड परिसरांत सर्वाधिक महागड्या दराने भाड्याने घर दिले जात आहे. तर रबाळे, तुर्भे या परिसरांत तुलनेने सामान्यांना परवडेल असा पर्याय उपलब्ध होत आहे. मात्र तरीदेखील करार संपल्यानंतर नियमाने 10 टक्के भाडेवाढीऐवजी नवीन भाडेकरू आणून भाड्यात प्रतिमहा 3 ते 5 हजार रुपये वाढ केली जाते. यामुळे सर्वसामान्यांना घर शोधणे कठीण झाले आहे.

विशेष म्हणजे, या व्यवहारात मालमत्ता भाड्याने मिळवून देणाऱ्या दलालांचे वर्चस्व अधिक आहे. सर्व व्यवहार या दलालावर सोपवून भाडे आकारण्याकडे घरमालकांचा अधिक कल असतो. घर भाड्याने घेणारे भाडेकरू प्रामुख्याने चाकरमानी व कामगार वर्ग आहे. घर भाड्याने घेताना संबंधितांना शिप्टींग चार्जेसच्या नावाखाली सोसायटीलादेखील काही रक्कम मोजावी लागत असल्याने या भाडेकरूंना नाहक भुर्दंड सोसावा लागत आहे. वाशीसारख्या परिसरात वन बीएचकेसाठी 25 ते 30 हजार रुपये प्रति महिना भाडे मोजावे लागत आहे. हीच स्थिती पाम बीच मार्गावरदेखील आहे. सीवूडमध्ये 25 ते 30 हजार रुपये वन बीएचकेसाठी प्रति महिना भाडे मोजावे लागत आहे, तर वाशीमध्ये 2 बीएचकेसाठी 35 हजारांपेक्षा अधिक मासिक भाडे आकारले जात आहे. सदनिकेमध्ये सर्व सोयीसुविधा उपलब्ध असतील तर हेच भाडे आणखी 5 ते 6 हजार रुपयांनी वाढते. कोपरखैरणे परिसरात माथाडींच्या वसाहतीमध्ये 15 ते 16 हजार रुपये मासिक भाडे आकारले जात आहे. पूर्वी हेच भाडे 4 हजार रुपये होते. मात्र माथाडी कामगारांनी घरावर दोन-दोन मजले वाढीव बांधकाम केल्याने या बांधकामापोटी घेतलेले कर्ज फेडण्यासाठी घरे भाड्याने दिली आहेत. ऐरोलीत वन बीएचकेसाठी 20 ते 22 हजार रुपये भाडे आकारले जात आहे. घणसोलीतील सिडको वसाहतीत देखील वन बीएचकेसाठी 22 ते 25 हजार रुपये भाडे आकारले जात आहे.

वाढती महागाई, घेतलेल्या कर्जाचे हप्ते, उदरनिर्वाहाचे साधन, कायद्यातील किचकट प्रक्रिया यामुळे घरमालकांकडून अधिक भाड्यासाठी तगादा लावला जातो. परिणामी, घरभाडे वाढविण्याशिवाय पर्याय राहत नाही. म्हणून घर रिकामे केल्यानंतर भाडेवाढ नवीन भाडेकरूसाठी लागू केली जात आहे.
शुभांगी गायकवाड, इस्टेट एजंट
अकरा महिन्यांचा करार संपल्यानंतर शक्यतो घरमालक पुन्हा करार करण्यास तयार नसतात. करार वाढवला तरी नियमाने 10 टक्केऐवजी सरळ अडीच ते 3 हजार रुपयांची भाडेवाढ लागू करतात. घरमालकांची ही भाडेवाढ स्वीकारण्याशिवाय पर्याय नसतो. परवडत नसले तरी डोक्यावर छप्पर असावे म्हणून ही भाडेवाढ मान्य करावीच लागते. भाडे नियंत्रण कायद्याची कोणतीही अंमलबजावणी नवी मुंबई शहरात होत नसल्याचे दिसून येत आहे. या कायद्याविषयी भाडेकरूदेखील अनभिज्ञ आहेत.
सागर कांबळे, रहिवासी

झोपडपट्टी परिसरातही भाव वधारला दिघा येथील कारवाईनंतर झोपडपट्टी परिसरातील घरमालकांचा भावदेखील वधारला आहे. नावाला झोपडपट्टी असणारा हा परिसर आता टुमदार घरांनी सजल्याने झोपडपट्टी परिसरातदेखील वन रूम किचनचे 5 ते 7 हजार रुपये भाडे आकारले जात आहे. पूर्वी गावठाण क्षेत्रात अत्यल्प दरात भाड्याने घरे उपलब्ध व्हायची, मात्र आता मागणी वाढल्याने ग्रामस्थांनीदेखील पूर्वीच्या तुलनेत अधिक भाडे आकारण्यास सुरुवात केली आहे. गावठाण क्षेत्रात 5 ते 6 हजार रुपये मासिक भाडे असलेली घरे सहज मिळायची, मात्र आता या ठिकाणीदेखील 8 ते 9 हजार रुपये भाडे मोजावे लागत आहे. चाळ परिसरातदेखील 5 ते 6 हजार रुपये भाडे घेतले जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT