नवी मुंबई: नवी मुंबई पोलीस आयुक्तांच्या हद्दीत ड्रग्ज विरोधी मोहीमेदरम्यान आफ्रिकन नागरिकांवर केलेल्या कारवाईत अनेक महत्वाच्या गांभीर स्वरुपाच्या बाबींचा उलगडा झाला. मुंबई, नवी मुंबईत अनेक आफ्रिकन नागरिक व्यापार, वैद्यकीय उपचार किंवा शिक्षणासाठी येतात. आणि नंतर ड्रग्ज तस्करीमध्ये सामील झाल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी गेल्या तीन महिन्यांत पाच मोठ्या धाडी टाकून शेकडो आफ्रिकन नागरिकांना पकडले. गेल्या तीन वर्षांत १५०० हून अधिक आफ्रिकन नागरिकांना मायदेशी पाठवण्यात आले आहे. त्यांच्या कॅन्टीन आणि अड्ड्यांवर कारवाई करून कोकेन आणि एमडीचा साठा उद्ध्वस्त केला आहे.
अंमली पदार्थ तस्करी विरोधात नवी मुंबई पोलिसांसमोर आता नवीन मोठे आव्हाने उभे आहे. जेएनपीए आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून येणाऱ्या प्रवाशांसह कार्गी सुविधांवर पोलीसांनी लक्ष केंद्रित करण्याची तयारी आतापासून सुरु केली आहे.
जेएनपीए हे मोठे बंदर असल्याने तेथे सातत्याने वॉच ठेवला जातो. आगामी आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि एअर कार्गो सुविधेवरही लक्ष ठेवण्यासाठी नवी मुंबई पोलीस सज्ज आहेत, अशी माहिती नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी अमली पदार्थ विरोधी मोहिमेबाबत बोलताना दिली.
शिवाय उरण, तळोजा, जेएनपीटी या विभागात असलेले कंटेनर यार्ड, गोदामातून गेल्या अडीच वर्षांपूर्वी दिल्ली पोलिसांनी १५०० कोटी रुपयांच्या अंमली पदार्थाचा साठा असलेला कंटेनर पकडला होता. सहा महिने हा कंटेनर गोडाऊनमध्ये धूळखात पडला होता.
मात्र अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्या एका आरोपीच्या दिल्ली पोलिसांनी मुसक्या आवळल्यानंतर त्याने थेट दिल्ली पोलिसांना नवी मुंबईत आणून अंमली पदार्थ असलेल्या मुद्देमालासह कंटेनर ताब्यात दिला होता. त्यावेळी अनेक यंत्रणांची झोप उडली होती.
नवी मुंबई पोलीस आयुक्तांच्या हद्दीत ड्रग्ज विरोधी मोहीम तीव्र करण्यात आली आहे. गेल्या तीन वर्षांपासून नवी मुंबई पोलिसांनी ड्रग्ज विरोधात 'झिरो टॉलरन्स' धोरण राबवले आहे. याचे सकारात्मक परिणाम आता दिसून येत आहेत.
हायड्रो गांजा आणि एअर कार्गो रॅकेट: थायलंड आणि अमेरिकेसारख्या देशांतून एअर कार्गोद्वारे येणाऱ्या 'हायड्रो गांजा'च्या तस्करीचा पर्दाफाश केला आहे. यामध्ये चिंचकर नावाच्या आरोपीच्या टोळीला अटक केली असून, या इकोसिस्टममध्ये सामील असलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले आहे. तसेच कस्टम आणि पोस्टल अधिकाऱ्यांनाही अटक केली आहे.
सीमेवरून ड्रोन्सद्वारे येणारे हेरॉईन पंजाबमार्गे देशात आणि नवी मुंबईत पुरवणाऱ्या टोळीचा तांत्रिक अभ्यास करून पोलिसांनी ४४ आरोपींना अटक केली आहे. महाराष्ट्रात प्रथमच नवी मुंबईत प्रत्येक पोलीस स्टेशन स्तरावर 'अँटी नार्कोटिक्स स्क्वॉड'ची निर्मिती करण्यात आली आहे. हे पथक सोसायट्यांमध्ये जाऊन माहिती घेते आणि पेडलिंगच्या अड्ड्यांवर लक्ष ठेवते.
विद्यार्थी, पालकांसाठी जनजागृती मोहीम
ड्रग्जचा पुरवठा तोडण्यासाठी शाळा-कॉलेजमधील विद्यार्थी व पालकांसाठी जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे. जेणेकरून अमली पदार्थांच्या सेवनावर नियंत्रण मिळवता येईल.