नवी मुंबई: नवी मुंबई महापालिकेत समावेश झाल्यानंतरही दुर्लक्षीत राहिलेल्या त्या 14 गावांपैकी पाच ग्रामपंचायतीचे दफ्तर ताब्यात घेण्यास नवी मुंबई महापालिकेने सुरुवात केली आहे. महापालिकेतील प्रत्येक विभागाने या गावांतील ग्रामसेवकांकडे माहिती मागवली आहे. मेच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ही माहिती संकलित केली जाणार आहे.
यासाठी परिमंडळ तीन नव्याने तयार केले असून त्यामध्ये निघू, मोकाशीपाडा, नावाळी, भंडार्ली, पिंपरी गाव, गोटेघर, बंबार्ली, उत्तरशिव, नागाव, नारीवली, वाकळण, बाळे आणि दहीसर मोरी आदी चौदा गावांचा समावेश केला आहे. त्याची जबाबदारी महापालिका उपायुक्त संजय शिंदे यांच्याकडे सोपवली आहे.
या 14 गावांच्या समावेशाला वनमंत्री गणेश नाईक यांनी सुरुवातीपासून विरोध आहे. मात्र या विरोधाला झुगारुन शिवसेनेचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 14 गावांचा समावेश नवी मुंबई महापालिकेत करण्याचा निर्णय घेतला आणि अध्यादेशही काढला. त्यानंतर राजकीय वातावरण तापले. मात्र त्याचा फारसा परिणाम झाला नाही. आता या 14 गावांचे दफ्तर 31 मार्चपर्यंत ताब्यात घेण्यासाठी झेडपी मुख्य कार्यकारी अधिकारी, महापौर, उपमहापौर यांनी पत्रव्यवहार केला आहे.
याबाबत महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी सर्व विभागातील समन्वय अधिकारी, कर्मचारी, ग्रामपंचायत अधिकारी यांची परिमंडळ 3 उपायुक्त यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत 27 मार्च रोजी एक बैठक घेतली. या बैठकीत अपेक्षित असलेल्या माहितीचा तक्ता या ग्रामसेवकांना देण्यात आला आहे. त्यामध्ये माहिती संकलित करुन देण्याचे सांगण्यात आले. 14 अधिकारी , कर्मचारी या कामासाठी महापालिकेने नियुक्त केले आहेत. यावेळी विद्युत, पाणी पुरवठा, शाळा, आरोग्य केंद्र, मालमत्ता, शिक्षण, घनकचरा, नगररचना, अतिक्रमण आणि सामान्य प्रशासन विभागाची माहिती या गावातील ग्रामसेवकांकडून मागवली आहे.
निधी उभारणे मोठे आवाहन
14 गावांमुळे महापालिका तिजोरीवर अंदाजे सुमारे 6,600 कोटींचा बोजा पडणार आहसे. एकत्रित क्षेत्रासाठी 6,100 कोटी तर निव्वळ गावठाणांतील सुविधांसाठी 591 कोटी लागतील, असे महापालिकेचे तत्कालीन शहर अभियंता संजय देसाई यांनी नगरविकास विभागाला कळविले आहे. मात्र यावर कोणताही निर्णय झालेला नाही. आता या चौदा गावांतून निवडून आलेल्या दोन नगरसेवकांनी महासभेत नागरी सुविधांची मागणी केली आहे. यामुळे इतका मोठा निधी कसा उभा करायचा याचे मोठे आव्हान महापालिका प्रशासनासमोर आहे.