नवी मुंबई मनपाने 7 महिन्यांत 500.11 कोटींचा मालमत्ताकर केला वसूल pudhari photo
मुंबई

Mumbai News : नमुंमपाच्या मंगळवारी होणाऱ्या आरक्षण सोडतीकडे इच्छुकांचे लक्ष

नवी मुंबईत मंगळवारी राखीव जागांचा फैसला : अनेकांचे राजकीय भविष्य पणाला

पुढारी वृत्तसेवा

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीची प्रभागरचना अंतिम झाली असून त्यामध्ये 111 सदस्यांसह चारचे पॅनल तर तीनचा एक पॅनल पडला आहे. आता शहरातील राजकीय इच्छुकांचे लक्ष मंगळवारी, 11 रोजी होणाऱ्या आरक्षण सोडतीकडे लागले आहे. वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृह येथे सकाळी 10 वाजता आरक्षण सोडत होणार आहे. कोणत्या प्रभागात अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी), इतर मागासवर्गीय (ओबीसी) आणि महिलांसाठी जागा राखीव राहणार याची उत्सुकता सर्वच पातळीवर लागून राहिली आहे. नवी मुंबईत 10 अनुसूचित जाती (एससी),2 अनुसूचित जमाती (एसटी) व 29 इतर मागासवर्गीय (ओबीसी) असे आरक्षण पडणार आहे. तर 56 महिलांसाठी आरक्षण असणार आहे. या आरक्षणाच्या गणितावर अनेक माजी नगरसेवक आणि नव्याने उभे राहणारे इच्छुक यांचे भविष्य अवलंबून आहे.

राज्य निवडणूक आयोगाने नवी मुंबई मनपाच्या प्रभागरचनेला अंतिम स्वरूप दिले असून शहरातील लोकसंख्या, सामाजिक रचना आणि मागील निवडणुकांतील आकडेवारीच्या आधारे नव्याने प्रभाग विभागले गेले आहेत. काही प्रभागांत बदल झाल्याने आरक्षणाचे गणितही बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावेळी कोणत्या प्रभागात एससी, एसटी किंवा महिलांचे आरक्षण लागू होणार आणि कोणत्या प्रभागात सामान्य वर्गासाठी जागा खुल्या राहतील, याबाबतची उत्सुकता आता वाढली आहे. आरक्षण सोडत ही 11 नोव्हेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे अनेक पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी आपले राजकीय समीकरण त्यानुसार ठरविण्याचे काम सुरू केले आहे. आरक्षण जाहीर झाल्यानंतरच प्रत्यक्ष उमेदवारीबाबतचे निर्णय उमेदवार घेणार आहेत.

नवी मुंबईतील विविध प्रभागांमध्ये मागील दोन कार्यकाळात महिला आणि ओबीसी वर्गाला मोठ्या प्रमाणावर संधी मिळाल्या होत्या. मात्र, यावेळी बदलत्या प्रभागानुसारही प्रभागांचे आरक्षण बदलण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. परिणामी, काही विद्यमान नगरसेवकांच्या जागा बदलण्याचा किंवा आरक्षणात अडकण्याचे संकेत मिळत आहेत. मंगळवारी आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर नवी मुंबईतील राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसू लागली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT