Navi Mumbai Municipal Corporation  Pudhari
मुंबई

NMMC Recruitment Stayed | नवी मुंबई महापालिकेच्या 132 पदांच्या भरतीला स्थगिती

नवी मुंबईतील स्थानिक प्रकल्पग्रस्त उमेदवारांसाठी हा निर्णय घेतल्याचा सभागृह नेते सागर नाईक यांचा खुलासा

पुढारी वृत्तसेवा

Navi Mumbai Municipal Corporation Recruitment Postponed

नवी मुंबई: नवी मुंबई महानगरपालिका सरळसेवा भरती अंतर्गत गट-अ, गट-ब व गट-क मधील 20 संवर्गातील 132 पदांकरिता मंगळवारी ( दि. 21) आणि बुधवारी (दि. 22) होणारी लेखी परीक्षा होणार होती. दरम्यान, या भरती प्रक्रियेलाच सोमवारी (दि.२०) झालेल्या महासभेत सभागृहाने स्थगिती देण्याचा ठराव मंजूर करून तो कायम केला.

केवळ नवी मुंबईतील स्थानिक प्रकल्पग्रस्त उमेदवारांसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सभागृह नेते सागर नाईक यांनी स्पष्ट केले. तात्काळ परीक्षार्थी विद्यार्थ्यांना परीक्षा स्थगित केल्याची माहिती महापालिकेने द्यावी, असे निर्देश महापौर सुजाता पाटील यांनी दिले.

महापालिकेने 132 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली होती. त्यासाठी राज्यभरातून एकूण 19, 220 उमेदवारांनी अर्ज केले होते. त्या अनुषंगाने सहा संवर्गाची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी ऑनलाईन स्पर्धा परीक्षा उद्या दि.21 व 22 जुलै या कालावधीत 6 जिल्ह्यांतील 13 परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार होती. मात्र, सोमवारी सत्ताधारी भाजपकडून सभागृह नेते सागर नाईक यांनी नवीन भरती नियम पुढच्या महासभेत सभागृहात आणला जाणार आहे. नवी मुंबईतील स्थानिक मुलांना भरतीत न्याय मिळू शकेल. यामुळे उद्या होणारी परिक्षा रद्द करून भरती प्रक्रिया स्थगित करण्याचा ठराव मांडण्यात आला.

यावर शिंदे सेनेचे जेष्ठ नगरसेवक शिवराम पाटील यांनी अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर असो किंवा इतर जिल्ह्यातून परिक्षा घेतली जाते. ही काही नीटची परिक्षा नाही. सध्या अनेक परिक्षेचे पेपर फुटतात. आणि परिक्षेत सेटिंग होत असल्याचा गंभीर आरोप शिवराम पाटील यांनी केला. ही भरती स्थगित करण्यात यावी, अशी मागणी केली.

यावर महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी आक्षेप घेतला. अशी कुठलीही सेटिंग होत नाही. ज्या जिल्ह्यात परिक्षा घेतली जात आहे. तेथील पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक यांना पत्र पाठवून कडक उपाययोजना केल्या आहेत. मोबाईल जॅमर लावण्याची परवानगी घेतली आहे. परिक्षा अवघी दोन दिवसांवर आली आहे. असा निर्णय घेणे योग्य नाही. हे प्रकरण न्यायालयात जाईल. न्यायालयाला आयुक्त म्हणून मला उत्तर द्यावे लागेल. अशी स्पष्ट भूमिका मांडली.

मात्र, सत्ताधारी पक्षाचे सभागृह नेते सागर नाईक यांनी न्यायालयात प्रकरण गेल्यास सभागृहाने निर्णय घेतल्याचे स्पष्ट करा, अशी भूमिका घेत हा ठराव मंजुरीसाठी महापौरांनी टाकावा, अशी मागणी केली. महापौरांनी ठराव एकमताने मंजूर करून तो कायम करण्याचे निर्देश महापालिका सचिवांना दिले. केवळ नवी मुंबईतील मुलांसाठी आम्ही हा निर्णय घेत असल्याचे सांगितले. भरती जाहिराती महापालिकेने भरती रद्द, पुढे ढकलण्याचे अधिकार महापालिकेला असल्याचे सांगत भरती प्रक्रिया स्थगित केल्याचे जाहीर केली.

पुढच्या महासभेत महापालिका सेवा भरती नियमावली सादर केली जाईल असे नाईक यांनी स्पष्ट केले.तर मनसे नगरसेवक अभिजीत देसाई यांनी भरती आणि लेखी परिक्षेला स्थगिती देऊन नका असा कडाडून विरोध केला. परिक्षा केंद्रांवर मुले पोहचली आहेत. तयारी पुर्ण झाली आहे. त्यामुळे लेखी परीक्षा घेण्याची मागणी केली. त्यानंतर सभागृहाने निर्णय घ्यावी अशी भूमिका मांडली.

महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी परीक्षा सुव्यवस्थितरित्या पार पाडाव्यात यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचे वर्ग 1 श्रेणीचे अधिकारी हे समन्वय अधिकारी म्हणून नियुक्त केले होते. त्याचप्रमाणे प्रत्येक केंद्रावर महानगरपालिकेचे 2 अथवा 3 अधिकारी केंद्र निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. अमरावती जिल्ह्यात 1112, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 2535, मुंबई जिल्ह्यात 8123, नागपूर जिल्ह्यात 948, नाशिक जिल्ह्यात 1783 व पुणे जिल्ह्यात 4429 अशा प्रकारे 6 जिल्ह्यात एकूण 18,930 उमेदवार परीक्षेस प्रविष्ट झाले आहेत. ही परीक्षा प्रक्रिया टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS ION) यांच्या माध्यमातून घेण्यात येणार होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT