Independence Day Pudhari
मुंबई

Independence Day: देशभक्तीच्या वस्तूंना बाजारात मागणी; खादीचे कपडे, तिरंगा टी-शर्ट, दुपट्ट्याला पसंती

दुकानांतही तिरंग्याच्या रंगांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.

पुढारी वृत्तसेवा

नवी मुंबई: १५ ऑगस्ट रोजी साजऱ्या होणाऱ्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील बाजारपेठा तिरंग्याच्या रंगात सजल्या असून देशभक्तीपर वस्तूंना मोठी मागणी वाढली आहे.

नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील सिग्नल परिसर, एपीएमसी मार्केट तसेच आठही नोडमधील दुकानांमध्ये तिरंगे, टी-शर्ट, दुपट्टे, कुर्ती, खादीचे कपडे, टोप्या यासह विविध देशभक्तीपर साहित्य विक्रीसाठी उपलब्ध झाले आहे. दुकानांतही तिरंग्याच्या रंगांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.

यंदा नागरिकांचा खादीच्या कपड्यांकडे विशेष कल दिसून येत असून खादीच्या शर्टची किंमत साधारण ४०० ते ९०० रुपये, तर खादीच्या कुर्त्यांची किंमत ३०० ते ६०० रुपये आहे. मुलांसाठी तिरंगी फ्रॉक अथवा ड्रेस २५० ते ६०० रुपये, तिरंगी कुर्ती २५० ते ५०० रुपये, तर तिरंगी टी-शर्ट १५० ते ३५० रुपये दराने विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

कापडी तिरंगा ३० ते २०० रुपये, खादीचा रुमाल ५० ते २०० रुपये, तिरंगी हेअरबँड व अन्य ॲक्सेसरीज २० ते २०० रुपये, तिरंगा पताका ३० ते २०० रुपये, तिरंगी टोपी २० ते ५० रुपये, तिरंगी रिबीन व बॅज १० ते ३० रुपये, तर छोटा कागदी तिरंगा १० ते २० रुपये दराने मिळत आहे.

लहान मुलांमध्ये तिरंग्याच्या रंगातील टी-शर्ट, फ्रॉक आणि कुर्तीला विशेष पसंती मिळत आहे. मुलींकडून तिरंग्याच्या रंगातील दुपट्टे खरेदी करण्याचे प्रमाण वाढले असून युवकांकडूनही तिरंगा टी-शर्ट आणि खादीचे कपडे खरेदी केले जात आहेत.

यंदा मागील वर्षाच्या तुलनेत देशभक्तीपर वस्तूंच्या विक्रीत वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. पूर्वी केवळ शासकीय कार्यालये, सहकारी संस्था, शाळा, महाविद्यालये आणि काही निवडक आस्थापनांमध्येच राष्ट्रध्वज फडकवला जात होता.

मात्र, नागरिकांना राष्ट्रध्वज फडकविण्याची मुभा मिळाल्यानंतर तिरंग्याच्या विक्रीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे दरवर्षी स्वातंत्र्यदिनाच्या काळात बाजारपेठांमध्ये तिरंग्याची मागणी वाढताना दिसत आहे.

प्लास्टिकवरील निर्बंधामुळे यंदा कागदी तिरंगे पुन्हा बाजारात दाखल झाले असून कापडी तिरंग्यांनाही मागणी वाढली आहे.

तिरंगा केवळ ध्वज म्हणून न वापरता देशभक्तीची भावना व्यक्त करण्यासाठी कपडे व विविध वस्तूंच्या माध्यमातूनही नागरिकांकडून त्याचा वापर केला जात आहे. त्यामुळे स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील बाजारपेठांमध्ये तिरंग्याच्या रंगांची उधळण पाहायला मिळत असून, खादीच्या कपड्यांपासून तिरंगा टी-शर्ट, दुपट्टे आणि टोप्यांपर्यंत विविध वस्तूंना ग्राहकांची पसंती मिळत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT