नवी मुंबई : कोपरखैरणे येथील सेक्टर १ मधील एका लॉन्ड्रीच्या दुकानात गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. या गोळीबारात एका तरुणीसह दोन जण जखमी झाले असून, घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी विकास उर्फ चार्ली नावाच्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून तपास सुरू केला आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजते.निवासी परिसरातील लॉन्ड्रीच्या दुकानात गोळीबार झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा गोळीबार नेमका कोणत्या कारणातून झाला, हल्ल्यामागील हेतू काय होता आणि या घटनेत ताब्यात घेतलेल्या तरुणाची नेमकी भूमिका काय आहे, याचा तपास पोलीस करीत आहेत.
दरम्यान, आरोपीला अटक करण्यात आली आहे की केवळ चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे, याबाबत अधिकृत पोलीस पुष्टी मिळणे बाकी आहे. तसेच गोळीबारामागील कारण आणि घटनेचा सविस्तर तपशील पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.