Plane Pudhari
मुंबई

Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळावर विक्रमी गर्दी; एका दिवसात २१२ विमानांची ये-जा, २७ हजार प्रवासी

व्यावसायिक विमानसेवा सुरू झाल्यापासून १९ नोव्हेंबर हा सर्वाधिक व्यस्त दिवस; इंडिगोच्या सर्वाधिक १२२ विमान हालचालींची नोंद.

पुढारी वृत्तसेवा

पनवेल: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने १९ नोव्हेंबर रोजी व्यावसायिक विमानसेवा सुरू झाल्यापासूनचा सर्वाधिक व्यस्त दिवस नोंदवला. या दिवशी विमानतळावर विक्रमी २१२ विमानांची ये-जा झाली आणि २७ हजारांहून अधिक प्रवाशांची हाताळणी करण्यात आली.

विमानतळावर १७३ नियोजित प्रवासी विमानांच्या हालचालींचे व्यवस्थापन करण्यात आले. यामध्ये ८७ आगमन आणि ८६ प्रस्थानांचा समावेश होता.

तसेच २० कार्गो विमानांच्या हालचाली झाल्या, ज्यामध्ये १० आगमन आणि १० प्रस्थानांचा समावेश होता. याशिवाय जनरल एव्हिएशनच्या १९ विमानांच्या हालचाली नोंदवण्यात आल्या. यामध्ये ८ आगमन आणि ११ प्रस्थानांचा समावेश होता.

नियोजित प्रवासी विमानांच्या हालचालींमध्ये इंडिगोने सर्वाधिक १२२ विमानांची ये-जा नोंदवली. त्यानंतर अकासा एअरच्या ३५, एअर इंडिया एक्सप्रेसच्या १० आणि एफएलवाय९१च्या ६ विमानांच्या हालचाली नोंदवण्यात आल्या. याशिवाय ३९ नॉन-शेड्युल्ड आणि कार्गो विमानांच्या हालचाली झाल्याची नोंद झाली.

आमचे उद्दिष्ट केवळ वाहतुकीचे नवे विक्रम प्रस्थापित करणे नाही, तर मुंबईच्या दीर्घकालीन विकासाला हातभार लावणारी सुरक्षित, कार्यक्षम आणि विस्तारक्षम विमानतळ व्यवस्था उभारणे आहे.

कनेक्टिव्हिटी वाढत असताना, एनएमआयए प्रादेशिक विमान वाहतूक पायाभूत सुविधांना अधिक पूरक ठरेल आणि भारतातील महत्त्वाच्या आर्थिक व विमान वाहतूक केंद्रांपैकी एक म्हणून मुंबईचे स्थान अधिक मजबूत करेल, असे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवक्त्यांनी सांगितले.

‘एनएमआयए’ची ही कामगिरी मुंबई महानगर प्रदेशासाठी एक महत्त्वाचे विमान वाहतूक केंद्र म्हणून विमानतळाची वाढती भूमिका अधोरेखित करते. तसेच जागतिक दर्जाचा प्रवासी अनुभव कायम राखत वाढत्या विमान वाहतुकीची मागणी पूर्ण करण्यासाठी विमानतळ सज्ज असल्याचेही यातून स्पष्ट होते, असेही विमानतळाच्या प्रवक्त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT