Navi Mumbai Airport
मुंबई: दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल 1 चे बुधवारी (दि. ८) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन कऱण्यात आले. प्रत्यक्ष विमान सेवा नोव्हेंबरमध्ये सुरू होणार असून तेव्हा मुंबईसोबतच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय हवाई नकाशावर दाखल झालेली असेल.
आता मुंबईतून बाहेर जाणाऱ्या आणि मुंबईत उतरणाऱ्या प्रवाशांना विमानतळांचे दोन पर्याय असतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल (BOM) आणि नवी मुंबई विमानतळ (NMI)
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन म्हणजे महामुंबईचे महाउड्डाण मानले जाते. आज घडीला देशातील सर्वांत व्यग्र म्हणजे सर्वाधिक उड्डाणांचे विमानतळ म्हणून दिल्ली पहिल्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. येणाऱ्या पाच-सात वर्षांतच मुंबईचे आंतरराष्ट्रीय विमानतळ दुय्यम ठरेल आणि नवी मुंबई हेच महामुंबईचे मुख्य विमानतळ म्हणून जगाच्या नकाशावर ओळखले जाईल.
सिडको आणि अदानी समूह यांनी संयुक्तपणे उभारलेल्या या विमानतळाचे बांधकाम अत्याधुनिक तंत्रज्ञान, पर्यावरणपूरक रचना आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयीसुविधांनी सजलेले आहे.
हे विमानतळ देशातील पहिले कार्बन न्यूट्रल ग्रीन एअरपोर्ट ठरेल. आतल्या भागात नैसर्गिक प्रकाश आणि वायुविजन यावर भर देण्यात आला असून सौरऊर्जेचा वीजपुरवठा, पर्जन्यजल साठवण व्यवस्था आणि हरित क्षेत्र राखून विमानतळाची रचना करण्यात आली आहे.
या विमानतळाला चार टर्मिनल असतील. तीन लाख चौरस मीटर परिसरात उभारलेल्या टर्मिनल-१ चे उद्घाटन होत आहे. या टर्मिनलवर एकावेळी ४२ विमाने उभी राहितील.
टर्मिनल-१ ची वार्षिक प्रवासी क्षमता २ कोटी आहे. तब्बल ५५ हजार उड्डाणे या टर्मिनलवरून होऊ शकतील.