कोपरखैरणे: नवी मुंबई शहरातही वाढत्या तापमानाचा तडाखा बसू लागला आहे. त्यामुळे आता रस्त्याकडेला झाडांच्या सावलीत रसाळ आणि गोड असे ताडगोळे विकणाऱ्यांकडे नागरिकांची पावले वळू लागली आहेत. यामुळे ताडगोळ्यांच्या विक्रीतून ग्रामीण विक्रेत्यांना हंगामी रोजगाराची संधीही निर्माण झाली आहे.
अद्याप मे महिना सुरु झाला नसला तरी गेल्या काही दिवसांपासून सूर्य आग ओकत आहे. रोजच्या रोज आज ऊन जरा जास्तच आहे असे म्हणण्याची वेळ आली आहे. रोज हळूहळू पारा चढत आहे. त्यामुळे अगदी सकाळपासूनच सूर्यनारायण कोपत असल्याने नागरिकांना तीव्र उष्णतेचा सामना करावा लागत आहे.
यामुळे शरीराची होणारी काहिली कमी करण्यासाठी अनेकजण ऊसाचा रस, शहाळी व कैरीच्या पन्हाचा आधार घेत आहेत. मात्र, त्यातही सध्या पांढऱ्या शुभ्र, मऊ व चवीला गोड ताडगोळ्यांनी पर्यटक आणि स्थानिकांना भुरळ घातली आहे.
ताडगोळे हे शरीराला शीतलता देणारे व आरोग्याच्यादृष्टीने लाभदायी असून ते उन्हाळी फळ म्हणून ओळखले जाते. त्यांना ‘आईस ॲपल’ असेही म्हटले जाते. मार्च ते जून महिन्यात ताडगोळ्यांची मागणी आणि विक्री सर्वाधिक असते. पावसाळा सुरू होईपर्यंत ही मागणी असते. त्यामुळे नवी मुंबईतील बेलापूर ते दिघा परिसरात ताडगोळे विक्रेते दिसून येत आहेत. मुख्य वर्दळीचे रस्ते, पर्यटनस्थळे अशा विविध ठिकाणी ताडगोळे विक्रेते दिसून येत आहेत.
नवी मुंबईत ताडगोळे पिकत नासले तरी वसईचा किनारपट्टी भाग उरण पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणावर ताडगोळ्यांची झाडे आहेत. त्यामुळे थेट ताड मालकाकडून किंवा घाऊक बाजारातून ताडफळ विकत घेतले जाते आणि त्यानंतर ते फोडून त्यातले ताडगोळे विकले जातात. सध्या 80 ते 120 रुपयांना डझनभर ताडगोळे या दराने विक्री केली जात आहे. हे दर ताडगोळ्यांच्या आकारावरून ठरतात. यामुळे शेतकरी आणि आदिवासी बांधवांना दोन ते तीन महिन्यांसाठी हक्काचा रोजगार उपलब्ध होत आहे.
उन्हाचा पारा वाढत असल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण समतोल राखण्यासाठी ताडगोळे हा नैसर्गिक पर्याय मानला जातो. पारदर्शक खोबऱ्यासारखे दिसणारे ताडगोळे गोड, तुरट चवीचे असतात. तहान भागवणारे असल्याने ग्राहकांकडून ताडगोळ्यांना मोठी मागणी आहे. विक्रीतून सर्व खर्च वजा जाता दिवसाकाठी 600 ते 900 सहज सुटतात. उन्हाळ्याचे हे दोन महिने हे ताडगोळे आमच्या कुटुंबासाठी रोजगाराचे साधन ठरतात.-प्रकाश आगासकर,ताडगोळे विक्रेता