नवी मुंबई : महापालिकेने आरोग्य क्षेत्रात एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. नवी मुंबईतील सर्वसामान्य नागरिकांसाठी विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी महापालिकेने मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली आहे. यामध्ये प्रामुख्याने एमआरआय आणि सीटी स्कॅन यांसारख्या महागड्या चाचण्या आता सर्वसामान्य नागरिकांना महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये मोफत किंवा अत्यंत माफक दरात उपलब्ध होणार आहेत.
महापालिकेच्या प्रथम संदर्भ रुग्णालयात ही अद्ययावत यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. महापालिकेच्या या निर्णयामुळे नवी मुंबईतील हजारो कुटुंबांना थेट लाभ मिळणार आहे. महापालिका आयुक्त आणि आरोग्य विभागाने घेतलेला हा निर्णय शहराच्या आरोग्य व्यवस्थेसाठी गेमचेंजर ठरणार आहे. फक्त चाचण्याच नव्हे, तर डायलिसिस आणि इतर गंभीर आजारांवरील उपचारही अधिक सक्षमपणे देण्याचा महापालिकेचा मानस आहे.
यापूर्वी खासगी रुग्णालयांमध्ये या चाचण्यांसाठी हजारो रुपये खर्च करावे लागत होते, मात्र आता नवी मुंबईकरांना या चाचण्या मोफत किंवा अत्यंत माफक दरात उपलब्ध होणार आहेत. आरोग्य विभागाकडून महत्वाच्या चाचण्या करण्यात येणार आहेत. त्यामध्ये एमआरआय आणि सीटी स्कॅनच्या सुविधांचा समावेश आहे. आता महापालिकेच्या माध्यमातून ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळणार असून खासगी लॅबमध्ये होणारी आर्थिक लूट थांबणार आहे.