Diwali decoration Pudhari
मुंबई

Diwali decoration: आकर्षक रोषणाई अन् सजावटीच्या वस्तूंनी बाजारपेठा गजबजल्या; दिवाळीच्या स्वागतासाठी नवी मुंबईकर सज्ज

खरेदीसाठी लगबग; आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित वस्तूंना पसंती

पुढारी वृत्तसेवा

​नवी मुंबई: दिवाळीच्या स्वागताची लगबग आणि फराळाची तयारी आता अंतिम टप्प्यात आली असताना, नवी मुंबईतील वाशी, ऐरोली, कोपरखैरणे, नेरूळ व सीबीडी बेलापूरसह विविध बाजारपेठा सजावटीच्या वस्तूंनी गजबजून गेल्या आहेत.

खरेदी करण्यासाठी नागरिकांची पावले बाजाराकडे वळली असून, यंदाच्या दिवाळीत पारंपारिक वस्तूंबबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित वस्तूंना मोठी पसंती मिळत आहे.

शहरातील बाजारपेठांमध्ये पारंपारिक मातीचे दिवे, रंगीबेरंगी रंगावल्या, कृत्रिम फुलांच्या माळा आणि आकाशकंदीलांपासून ते आधुनिक एलईडी रोषणाईपर्यंतचे विविध पर्याय उपलब्ध आहेत. घराच्या प्रवेशद्वारासाठी कृत्रिम आंब्याची पाने, झुबकेदार फुलांचे हार, मणी आणि आरशांचे काम असलेली आकर्षक तोरणे ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

तसेच देवघर आणि बैठकीच्या खोलीसाठी आकर्षक फुलदाण्या, भिंतीवरील सजावटीच्या वस्तू, पितळी व मरोळ्याचे पाट उपलब्ध आहेत. खिडक्या, बाल्कनी आणि भिंती सजवण्यासाठी एलईडी दिव्यांच्या माळा, बदामाच्या आकारातील रोषणाई, सजावटीच्या वेगवेगळ्या डिझाईन्स आणि कॅण्डल होल्डर यांना नागरिक मोठ्या प्रमाणावर खरेदी करत आहेत. यंदाच्या दिवाळी बाजारात आधुनिकतेची झलक पाहायला मिळत आहे.

सेन्सॉरवर चालणारे दिवे, रंग बदलणारी रोषणाई आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे दिवे ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत. याशिवाय कागदी व कापडी लहान-मोठे स्टिकर्स, रांगोळीसोबत लावण्यासाठीचे स्टिकर्स आणि 'लक्ष्मीची पावले' व 'शुभ-लाभ'च्या विविध डिझाईन्स उपलब्ध आहेत.

व्यावसायिक आस्थापना आणि घरांसाठी टेबल डेकोर, सजावटीच्या फुलांचे कॅण्डल होल्डर आणि कमळाच्या आकारातील दिवे यासारखे आधुनिक पर्याय देखील मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी आले आहेत. त्याला मोठी पसंती मिळत आहे.

किमती आणि ग्राहकांचा संमिश्र प्रतिसाद

सजावटीच्या वस्तूंचे प्रकार, आकार आणि साहित्यानुसार त्यांच्या किमती ठरलेल्या आहेत. बाजारात साधी तोरणे ८० ते ३०० रुपयांपर्यंत, रांगोळीचे रंग २० ते ८० रुपयांपर्यंत, तर आकाशकंदील व दिव्यांच्या माळा १०० ते ४०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत.

तसेच शुभेच्छा देणारे स्टिकर्स १०० रुपयांपासून पुढे मिळतात. ​नोकरी आणि घरातील इतर कामांमुळे सजावटीसाठी फारसा वेळ मिळत नसल्याने अनेक नागरिक तयार रांगोळी, सजावटीचे स्टिकर्स आणि कृत्रिम फुलांच्या माळांना पसंती देत आहेत.

कमी वेळेत घर सजवणे शक्य होत असल्यामुळे आणि दरवर्षी नवीन वस्तू खरेदी करण्यापेक्षा टिकाऊ व पुन्हा वापरता येतील अशा वस्तूंना नागरिक प्राधान्य देत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT