नवी मुंबई: नवी मुंबईतील क्लस्टर योजनेच्या मुद्द्यावरून महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उघड झाले असून, शिवसेना आणि भाजपमध्ये शाब्दिक संघर्ष रंगला आहे. वनमंत्री गणेश नाईक यांनी क्लस्टर योजनेबाबत व्यक्त केलेल्या भूमिकेवर शिवसेना उपनेते विजय चौगुले यांनी पत्रकार परिषद घेऊन जोरदार पलटवार केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने राबवण्यात येणाऱ्या क्लस्टर योजनेला विरोध हा केवळ राजकीय श्रेयवादातून होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
अलीकडेच एका कार्यक्रमात गणेश नाईक यांनी क्लस्टर योजनेमुळे नवी मुंबईतील वाहतूक कोंडी, लोकसंख्येचा वाढता ताण आणि नागरी सुविधांवर अतिरिक्त भार पडण्याची शक्यता व्यक्त केली होती. शहराचे नियोजन बिघडू नये, यासाठी अशा योजनांचा गांभीर्याने विचार होणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले होते.
यावर प्रतिक्रिया देताना विजय चौगुले म्हणाले की, आज क्लस्टर योजनेला विरोध करणारे गणेश नाईक यांनी २०१४ मध्ये याच योजनेचे समर्थन केले होते. त्यांचे मूळ गाव बोनकोडे परिसरात क्लस्टर योजनेंतर्गत पायलट प्रकल्पाचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. त्यावेळी ही योजना योग्य वाटत होती, मग आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तीच योजना नागरिकांच्या हितासाठी राबवली जात असताना विरोध का केला जात आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
ठाण्यातील किसननगर परिसरात क्लस्टर योजनेद्वारे यशस्वी पुनर्विकास झाल्याचे उदाहरण देत चौगुले यांनी सांगितले की, नवी मुंबईतील जुन्या, धोकादायक आणि अपुऱ्या सुविधांच्या इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी ही योजना दिलासा ठरू शकते. त्यामुळे या योजनेला विरोध करण्याऐवजी सकारात्मक सहकार्य करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी चौगुले यांनी गणेश नाईक यांच्यावर आणखी टीका करत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष टीका केली, तर शिवसेना गप्प बसणार नाही. गरज पडल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही दिला.
अनधिकृत बांधकामांच्या मुद्द्यावरूनही त्यांनी नाईक यांना लक्ष्य केले. त्यांच्या मंत्रीपदाच्या कार्यकाळात नवी मुंबईत मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे झाली. एमआयडीसीतील अनेक औद्योगिक जागांवर गृहप्रकल्प उभे राहिले, असा आरोप त्यांनी केला.
क्लस्टर योजनेवरून सुरू झालेला हा वाद आता केवळ पुनर्विकासापुरता मर्यादित न राहता महायुतीतील स्थानिक राजकीय वर्चस्वाच्या संघर्षात परिवर्तित होत आहे. एका बाजूला गणेश नाईक शहराच्या पायाभूत सुविधांवरील ताणाचा मुद्दा उपस्थित करत आहेत, तर दुसऱ्या बाजूला शिवसेना ही योजना जुन्या आणि धोकादायक इमारतींतील रहिवाशांसाठी आवश्यक असल्याचे ठामपणे सांगत आहेत.
या घडामोडींमुळे नवी मुंबईतील क्लस्टर योजनेबाबतचा राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे असून, आता गणेश नाईक यांचे पुढील उत्तर व शिवसेनेची पुढील भूमिका याकडे राजकीय वर्तुळासह नागरिकांचेही लक्ष लागले आहे.