Navi Mumbai Car Accident Pudhari
मुंबई

Navi Mumbai Car Accident: तळोज्यात भीषण अपघात! भरधाव इलेक्ट्रिक कार दुकानात घुसली; तिघांचा मृत्यू, 8 जण गंभीर जखमी

Navi Mumbai Car Accident Taloja: चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याची प्राथमिक माहिती आहे. नेमके कारण पोलीस तपासत आहेत.

पुढारी वृत्तसेवा

Navi Mumbai Car Accident Taloja: नवी मुंबईतील तळोजा परिसरात एक भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने येणाऱ्या एका इलेक्ट्रिक कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट रस्त्यालगतच्या दुकानात घुसली. या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 8 जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, कारने दुकानासमोर उभ्या असलेल्या अनेक नागरिकांना जोरदार धडक दिली. त्यानंतर वाहन थेट दुकानात घुसल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली.

घटनेची माहिती मिळताच तळोजा पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जखमींना त्वरित जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. चालकाचे वाहनावरील नियंत्रण कसे सुटले, वाहनाचा वेग किती होता, तसेच चालक अमली पदार्थाच्या प्रभावाखाली होता का, याचा तपास पोलीस करत आहेत. यासाठी संबंधित चालकाची वैद्यकीय तपासणी आणि अन्य पुरावेही तपासले जात आहेत.

या भीषण अपघातामुळे तळोजा परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा सुरू केला असून सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबांच्या आधारे पुढील तपास सुरू आहे. या दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे पोलिसांकडून अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT