नवी मुंबई : सहा फुटांपेक्षा उंच गणेश मूर्तींचे क्रेनच्या सहाय्याने विसर्जन करण्यात आले.  pudhari photo
मुंबई

Navi Mumbai Ganpati visarjan : नवी मुंबईत आनंदाश्रूंनी बाप्पांना निरोप

अनंत चतुर्दशीदिनी 10,678 गणेशमूर्तींचे विसर्जन : जोरदार पावसाचीही हजेरी

पुढारी वृत्तसेवा

नवी मुंबई : लाडक्या गणरायास अनंत चतुर्दशीदिनी नवी मुंबईत भावपूर्ण उत्साहात निरोप देण्यात आला. दहा दिवसांचा पाहुणचार घेऊन शनिवारी बाप्पा आपल्या घरी गेले. त्यांना निरोप देण्यासाठी पावसानेही जोरदार उपस्थिती लावली होती. यामुळे गणेशभाक्तांचा आनंद द्विगुणित झाला. ढोल -ताशांच्या निनादात गणेशभक्त बेधुंद होऊन नाचत विर्सजन मिरवणूक काढून उत्साहपूर्ण वातावरणात बाप्पाचे विर्सजन केले.

नवी मुंबई महापालिकेच्या 165 विसर्जनस्थळी केलेल्या सुयोग्य व्यवस्थेत अनंत चतुर्दशीदिनी मोठ्या प्रमाणात होणारा विसर्जन सोहळा सुव्यवस्थित संपन्न झाला. 22 नैसर्गिक व 143 कृत्रिम विसर्जनस्थळी 9929 घरगुती व 749 सार्वजनिक अशाप्रकारे एकूण 10678 श्रीगणेशमूर्तींचे गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा गजरात भावपूर्ण विसर्जन करण्यात आले. वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे बनविण्यात आलेल्या मोठ्या व्यासपीठावरून विसर्जनस्थळाकडे प्रस्थान करणा-या श्रीगणेशमूर्तींवर पुष्पवृष्टी करण्यात येत होती.

या वर्षीचे वैशिष्ट्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चौकातील विसर्जन सोहळ्याचे नवी मुंबई महापालिकेच्या यू ट्युब व फेसबुक चॅनेलवरून थेट (लाईव्ह) प्रक्षेपण करण्यात आले होते. त्यामुळे अनेक नागरिकांनी हा सोहळा ऑनलाईन अनुभवला. नवी मुंबईत सकाळपासूनच पावसाचा जोर असूनही नागरिक मोठ्या उत्साहाने या विसर्जन सोहळ्यात सहभाग झाले होते. रविवारी पहाटे 5.30 पर्यंत चाललेल्या या विसर्जन सोहळ्यासाठी महापालिकेची यंत्रणा अथक कार्यरत होती. सर्वच विसर्जन स्थळांवर चोख व्यवस्था ठेवण्यात आली होती.

आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी मोठ्या संख्येने मूर्ती विसर्जन होते अशा कोपरखैरणे धारण तलावावरील यांत्रिकी तराफा, फोर्कलिफ्ट व क्रेन सुविधेची पाहणी केली तसेच इतर विविध ठिकाणच्या विसर्जन स्थळांना भेटी देत व्यवस्थेची पाहणी करत मौलिक सूचना केल्या. या सूचनांची त्वरित अंमलबजावणी करण्यात आली.

पर्यावरणपूरक दृष्टिकोन

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 6 फूटांपर्यंतच्या उंच मूर्तींचे कृत्रिम तलावातच विसर्जन करावे या आयुक्तांनी केलेल्या आवाहनास अनुसरून नागरिकांनी मोठ्या प्रमाणात कृत्रिम तलावात विसर्जन करीत पर्यावरणशील दृष्टीकोन जपला. पर्यावरणपूरक प्लास्टिकमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याच्या आवाहनासही शाडू मातीच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करून नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. अशा नागरिकांना आकर्षक कागदी पिशवीसह आयुक्तांच्या स्वाक्षरीचे पर्यावरणमित्र असे प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

स्वतंत्र निर्माल्य संकलन व्यवस्था

नवी मुंबईत श्रीमूर्तींसोबत विसर्जन स्थळी आणले जाणारे पुष्पमाळा, फुले, दुर्वा, शमी यासारखे पुनर्प्रक्रीया करण्यायोगे ओले निर्माल्य तसेच मूर्तीच्या गळ्यातील कंठी, सजावटीचे सामान असे सुके निर्माल्य टाकण्यासाठी स्वतंत्र निर्माल्य कलशांची व्यवस्था करण्यात आली होती. या वस्तू पाण्यात टाकू नयेत अशाप्रकारे महापालिकेमार्फत करण्यात येणा-या आवाहनाला भाविकांकडून चांगला प्रतिसाद लाभला. या निर्माल्याची वाहतूक करण्यासाठी स्वतंत्र वाहन व्यवस्था करण्यात आली होती. हे 14 टन 70 किलो संकलित निर्माल्य महापालिकेच्या तुर्भे प्रकल्पस्थळी विशेष वाहनांव्दारे वाहून नेण्यात आले. त्याचे पावित्र्य जपत त्यावर खतनिर्मिती प्रक्रिया करण्यात येत आहे.

स्वच्छता कर्मचार्‍यांना हातमोजे व खाद्यपदार्थांचे वाटप

गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर लायन्स क्लब ऑफ ऐरोलीतर्फे दिघा येथील विसर्जन घाटावर स्वच्छता कर्मचार्‍यांसाठी विशेष सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत घाटावर अखंड सेवा बजावणार्‍या स्वच्छता कर्मचार्‍यांना हातमोजे वाटप करण्यात आले. तसेच स्वच्छता कामगारांसह विसर्जन घाटावर उपस्थित फेरीवाले व गरजूंना खाद्यपदार्थांचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी दिघा विभाग कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त नैनेश बदले यांनी लायन्स क्लबच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नैसर्गिक जलस्त्रोतांचे रक्षण व्हावे यादृष्टीने 6 फूटांपर्यंतच्या उंच मूर्ती कृत्रिम तलावातच विसर्जित करण्यात याव्यात यासाठी आठही विभाग कार्यालय क्षेत्रात 143 इतक्या मोठया संख्येने कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली होती. पर्यावरणप्रेमी नागरिकांनी कृत्रिम तलावांमध्ये श्रीमूर्ती विसर्जनास मोठया प्रमाणावर पसंती दर्शविली. नागरिकांकडून मिळालेल्या उत्तम सहकार्यामुळे यावर्षीचा श्रीगणेशोत्सव पर्यावरणशील पध्दतीने उत्तमरित्या निर्विघ्नपणे पार पडला.
डॉ.कैलास शिंदे, आयुक्त नमुंमपा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT