नवी मुंबईत रिक्षांच्या संख्येत तिपटीने वाढ pudhari photo
मुंबई

Navi Mumbai rickshaw increase : नवी मुंबईत रिक्षांच्या संख्येत तिपटीने वाढ

खुल्या परमिटनंतर शहरात पडली 25 हजार 224 रिक्षांची भर

पुढारी वृत्तसेवा

नवी मुंबई : नवी मुंबईत मोठ्या प्रमाणात रिक्षांचे परमिट दिल्याने शहरात रिक्षांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्याचा परिणाम व्यवसायावर झाल्याने रिक्षाचालक मेटाकुटीला आले आहेत. रिक्षांचा सर्वांसाठी परवाना खुला झाल्यानंतर रिक्षांच्या संख्येत तिपटीनेे वाढ झाल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. खुले परिमट करण्याअगोदर नवी मुंबई उपप्राद्रेशिक परिवहन कार्यालयात 12,500 रिक्षा होत्या. मात्र आजमितीस 37,724 रिक्षा झाल्या आहेत. परिणामी, धंदा कमी झाला आहे, अशी व्यथा रिक्षाचालकांनी व्यक्त करत आहेत.

नवी मुंबईत 12,500 जुन्या परमिटचे रिक्षाचालक आहेत.2017 पासून परमिट खुले करण्यात आले. त्यामुळे जवळपास 25,224 नवीन रिक्षा परमिटचे वाटप करण्यात आले. मागील काही वर्षांपासून वाढलेली महागाई, कमी झालेली प्रवासी संख्या आणि शहरात पसरलेले एनएमएमटी बसचे जाळे यामुळे रिक्षाच्या धंद्यावर मोठा परिणाम झाला आहे. त्यात रोज नवीन रिक्षांची भर पडत असल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाल्याचे रिक्षाचालकांनी सांगितले.

शहरातील बेकायदा रिक्षा काही अंशी कमी झाल्या असल्या तरी जुन्या रिक्षांवरील परमिट उतरवल्यावर त्यात खासगी रिक्षांची भर पडली आहे. हे रिक्षाचालक सकाळी व रात्री व्यवसाय करतात. या सर्व प्रकाराची झळ अधिकृत रिक्षाचालकांना बसत असल्याचे त्यांनी सांगितले. आरटीओने महिलांसाठीही रिक्षाचे परवाने दिले आहेत. त्यांना अबोली रंगाच्या रिक्षा दिल्या आहेत. यामुळे नवी मुंबईत 80 महिलांना रोजगार मिळाला आहे. अबोली रिक्षा फक्त महिलाच चालवू शकत असल्याने त्याऐवजी काळी पिवळी रिक्षा घेण्याकडेच महिलांचा अधिक कल आहे.

अटी -शर्थीही केल्या शिथिल

केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्रालयाने नोव्हेंबर 1997 मध्ये रिक्षा मुंबईसह ठाणे, पुणे, नागपूर, सोलापूर, नाशिक आणि औरंगाबाद जिल्ह्यांतील रिक्षांच्या संख्येवर मर्यादा आणावी असे आदेश दिले होते. त्यानुसार शासनाने ठरावीक मर्यादेबाहेर परवाने जारी होणार नाहीत अशी तजवीज केली होती. जून 2017 मध्ये परवाने खुले करण्यात आले. यासाठी अटी शर्थीही शिथिल केल्या. परवाने खुले नसताना रिक्षांची संख्या मर्यादित होती. मात्र ते खुले केल्यावर त्यांची संख्या वाढेल व प्रवाशांची गैरसोय टळेल हा त्यामागील उद्देश होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT