नवी मुंबई : रा़जेंद्र पाटील
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर असले तरी या विमानतळाचे उद्घाटन आता सप्टेेंबरऐवजी ऑक्टोबरमध्ये होईल आणि पहिले टेकऑफ मात्र डिसेंबरमध्ये होणार आहे.
सप्टेेंबरपर्यंत सर्व कामे पूर्ण करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस यांनी गेल्या जुलैमध्ये विमानतळ कामांची पाहणी केल्यानंतर दिले होते. त्याचवेळी उद्घाटनाचा मुहूर्त यंदाच्या नवरात्रीत म्हणजे सप्टेंबरमध्ये असेल, असे म्हटले जात होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेळ मिळाल्यास 30 सप्टेंबरला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू करण्याचा राज्य सरकारचा मानस होता. मात्र, हा मुहूर्त आता किंचित पुढे गेला आहे.
पुढारी प्रतिनिधीशी अनौपचारिक चर्चा करताना सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी सांगितले की, उद्घाटन झाल्यानंतर हे विमानतळ केंद्राच्या सीआयएसएफकडे सोपविण्यात येईल. ही प्रक्रिया दोन महिने चालेल. ती पूर्ण होताच डिसेंबरमध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिले विमान झेप घेईल.
सद्यस्थितीत या विमानतळाचे 94 टक्क्यांहून अधिक कामे पूर्ण झाली आहेत. सिंघल यांनी आतापर्यंत आठ वेळा विमानतळाची पाहणी केली. विमानतळ मार्गावर सुरू असलेले रस्ते, उड्डाणपूल, टेकडी, अटल सेतू मार्गाकडे जाणारा मार्ग, धावपट्टी, उभारलेले टॉवर ही कामे झपाट्याने पूर्ण होत असून, मुख्य इमारतीचा आकार ‘कमळाच्या फुलासारखा असू शकेल. या विमानतळाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते आणि उद्घाटनही आता त्यांच्याच हस्ते होणार आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेणारी इंडिगो ही पहिली एअरलाईन्स ठरेल. नोव्हेंबर 2025 च्या सुरुवातीपर्यंत नवी मुंबई विमानतळावरून दररोज 79 उड्डाणे होतील आणि यापैकी 14 आंतरराष्ट्रीय असतील, असे इंडिगोने यापूर्वीच जाहीर केले आहे.
या विमानतळावरून दरवर्षी सुमारे 90 दशलक्ष प्रवासी आणि 3.2 टन मालवाहतूक केली जाईल. 2 हजार 866 एकरवर हे आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यात आले आहे.
अदानी ग्रुपकडे सध्या मुंबई, अहमदाबाद, लखनौ, मंगळुरू, जयपूर, गुवाहाटी आणि तिरुवनंतपुरम विमानतळ प्रकल्प आहेत. नवीन नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पूर्ण झाल्यानंतर तेदेखील अदानी समूहाच्याच हाती असेल.