नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन 30 सप्टेंबरला पंतप्रधान मोदींच्या हस्ते? pudhari photo
मुंबई

Navi Mumbai Airport inauguration : नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन 30 सप्टेंबरला पंतप्रधान मोदींच्या हस्ते?

पहिले विमान घेणार डिसेंबरमध्ये ‘टेक ऑफ’, 96 टक्के काम पूर्ण

पुढारी वृत्तसेवा

नवी मुंबई : राजेंद्र पाटील

बहुचर्चित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवार, दि. 30 सप्टेंबर रोजी होण्याची शक्यता आहे. सिडकोच्या सूत्रांनी ही माहिती दिली. या विमानतळाचे भूमिपूजनदेखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते.

उद्घाटनानंतर सुरक्षाविषयक सर्व परवानग्या प्राप्त होताच सीआयएसएफच्या ताब्यात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची सुरक्षा व्यवस्था सोपवली जाईल, अशी माहितीदेखील सिडकोच्या सूत्रांनी दिली. विमानतळाचे 96 टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे.

डिसेंबरमध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन पहिल्या विमानाचे उड्डाण होईल, अशी माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी ऑगस्टमध्ये पत्रकारांशी केलेल्या औपचारिक चर्चेच्या वेळी दिली होती. केंद्राकडून विमानतळाच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत गेल्या आठवड्यात पुन्हा एकदा माहिती घेण्यात आली. 12 जुलै रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उलवे येथील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला भेट देत विमानतळाची पाहणी केली होती.

यावेळी 30 सप्टेंबरपर्यंत विमानतळाचे उर्वरित कामे पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी अदानी आणि सिडकोला दिले होते. हे काम पूर्ण होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेळ मिळाल्यास 30 सप्टेंबरला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरु करण्याचा विचार राज्य सरकारने चालवला होता. त्यानुसार नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाची कामे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्या देखरेखीखाली युद्धपातळीवर सुरु आहेत.

विमानतळाकडे जाणारा उड्डाणपुलापासून वर्तुळाकार पूल, विमानतळाकडे जाणार्‍या मार्गावर रस्ते, संरक्षित भिंत, दिवाबत्ती, 20 ते 25 फूट उंच झाडे लावण्यात आली आहेत. उलवेमधून जाणार्‍या अटल सेतु मार्गावर दुभाजकांचे सुशोभीकरण, रंगीबेरंगी झाडे लावण्याचे काम चार दिवसांपासून सुरु आहे.

सिडकोने 1 हजार 160 हेक्टर क्षेत्रामध्ये 5.5 मीटरपर्यंत भूविकास, उलवे नदीचा प्रवाह वळविणे आणि उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांचे स्थानांतरण, ही विकासपूर्व कामे पूर्ण केली आहेत. 11 ऑक्टोबर 2024 रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर भारतीय हवाई दलाचे विमान सी-295 उतरवण्यात आले होते. तसेच इंडिगो एअरलाइन्सच्या एअरबस ए 320 ने 29 डिसेंबर 2024 रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहिले व्यावसायिक लँडिंग यशस्वीरित्या पूर्ण केले होते.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या 1 आणि 2 टप्प्यामध्ये 20 दशलक्ष प्रवासी आणि 0.8 दशलक्ष मेट्रिक टन मालवाहतूक करण्याची क्षमता आहे, त्या निर्देशानुसार सिडकोकडून कामे प्रगतीपथावर आजही सुरु असून लक्ष ठेवून आहेत.

  • 2,866 एकरमध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यात आले आहे.

  • 3,700 मीटर लांबीची धावपट्टी या विमानतळावर असेल.

  • 90 दशलक्ष प्रवासी आणि 3.2 दशलक्ष टन मालवाहतूक या विमानतळावरून दरवर्षी होईल.

  • नवी मुंबईचे विमानतळ ‘फ्युचर रेडी’ असेल.

  • बॅगेज ट्रॅकिंगसाठी 360 डिग्री बारकोड स्कॅनिंगची सुविधा असेल.

  • जगातील सर्वात वेगाने प्रवास करणारी बॅगेज सिस्टीम इथे कार्यान्वित केली जाणार आहे.

  • विमानतळावर एक किमीपर्यंत चालण्याऐवजी ‘ट्रॅव्हलर’सुविधा देण्यात येणार आहे. जेणेकरुन वयोवृध्द आणि दिव्यांग प्रवाशांना अडचण येणार नाही.

  • देशातील पहिली आंतरराष्ट्रीय एज्युकेशन सिटी या विमानतळाच्या 5 किमी अंतरावर. नामांकित 10 परदेशी विद्यापीठाचे कॅम्पस उभारण्यात येणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT