नवी मुंबईत 75 हून अधिक बाईक टॅक्सींवर कारवाई pudhari photo
मुंबई

Illegal bike taxi : नवी मुंबईत 75 हून अधिक बाईक टॅक्सींवर कारवाई

रॅपिडोच्या 70, तर उबेर कंपनीच्या 5 दुचाकीस्वारांचा समावेश

पुढारी वृत्तसेवा

वाशी : राज्यात बाईक टॅक्सीला बंदी असतानाही ॲपद्वारे प्रवासी बुकिंग घेऊन त्यांची वाहतूक करणाऱ्या 75 हून जास्त बाईक टॅक्सी चालकांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दत्तात्रेय सांगोलकर यांनी दिली. यात रॅपिडो कंपनीच्या ॲपद्वारे प्रवासी वाहतूक करणाऱ्या 70, तर उबेर कंपनीच्या एप्लीकेशनद्वारे प्रवासी वाहतूक करणाऱ्या 5 दुचाकीस्वारांचा समावेश आहे.

एकट्या प्रवाशाला दुचाकीवरून निश्चित ठिकाणी पोहोचवण्यासाठी काही कंपन्यांकडून मोबाइल ॲप्लिकेशन चालवले जाते; मात्र या कंपन्यांना राज्यात बाईक टॅक्सी चालवण्यास अद्यापपर्यंत शासनाकडून परवानगी मिळालेली नाही. तरीही अशा प्रकारच्या बाईक टॅक्सी शहरात प्रवासी वाहतूक करत असल्याच्या तक्रारी परिवहन विभागाला प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार गेल्या काही महिन्यांपासून याप्रकरणी कारवाई केली जात आहे.

जानेवारी 2025 ते नोव्हेंबरपर्यंत 75 हून अधिक बाईक टॅक्सी चालवणाऱ्यांवर अवैध प्रवासी वाहतूक केल्याच्या आरोपाखाली कारवाई करण्यात आली आहे. त्यात 17 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. अवैध प्रवासी वाहतूक केल्या प्रकरणी 1,76,500 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. तसेच संबंधितांकडून आतापर्यंत 51,500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. दंड आकारलेल्या दुचाकी काळ्या यादीत टाकल्या जातात. जोपर्यंत चालक दंड भरत नाही, तोपर्यंत त्या काळ्या यादीतून काढल्या जात नाहीत.

रॅपिडोच्या तीन दुचाकी जप्त

वारंवार कारवाई करूनही शहरात काही प्रमाणात बाईक टॅक्सी चालू असल्याची माहिती प्राप्त झाली होती. त्याची पडताळणी करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या पथकाने मंगळवारी प्रत्यक्ष रॅपिडोचा वापर केला. त्यामध्ये तीन वेळा केलेल्या बुकिंग स्वीकारून प्रवासी भाडे घेण्यासाठी तीन दुचाकी हजर झाल्या होत्या.

या तीनही दुचाकी आरटीओच्या पथकाने ताब्यात घेऊन रॅपिडो कंपनीविरोधात एपीएमसी पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यावरून मंगळवारी रॅपिडो कंपनीवर गुन्हा दाखल करून 3 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत, अशी माहितीही दत्तात्रेय सांगोलकर यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT