Census Survey File Photo
मुंबई

Census Survey: जनगणनेची माहिती घेताना प्रगणकांच्या नाकीनऊ; उन्हाच्या झळा असह्य, त्यात मुंबईकरांच्या प्रश्नांचा भडिमार

घर उघडे असले तरी कुटुंबप्रमुख घरी नसतात. त्यात उलट प्रश्नांचा भडिमार होत असल्‍याच्‍या भावना प्रगणकांनी व्‍यक्‍त केल्‍या आहेत.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: १६ व्या राष्ट्रीय जनगणनेतील घरगणनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली असून प्रगणक घरोघरी जात माहिती संकलित करीत आहेत. उन्हाच्या झळा सहन करीत ते कसेबसे घरापर्यंत पोहोचत आहेत, मात्र घराला कुलूप लागलेले असते. घर उघडे असले तरी कुटुंबप्रमुख घरी नसतात. त्यात उलट प्रश्नांचा भडिमार होत असल्‍याच्‍या भावना प्रगणकांनी व्‍यक्‍त केल्‍या आहेत.

पहिल्या टप्प्यात जेथे जेथे मॅपिंग झाले आहे, तेथे प्रगणक जनगणनेची संपूर्ण प्रक्रिया डिजिटल पद्धतीने दुसऱ्या टप्प्यात राबवत आहेत. यात घरोघरी जाऊन कुटुंबप्रमुखांकडून माहिती घेत ती अपलोड करावी लागत आहे. मात्र अनेक घरांत कुटुंबप्रमुख घरी भेटतच नाहीत. नंतर या, असे सांगून दरवाजे बंद होत आहेत.

जेथे भाडेकरू राहतात तेथील घरांची योग्य माहिती मिळत नाही. अनेक इमारतींमध्ये उदवाहन नसल्याने ४ मजले चढून घरापर्यंत पोहोचत आहेत. मात्र, घरी गेल्यावर त्यांना अपेक्षित उत्तरे मिळत नाहीत, असे अंधेरी येथील शिल्पा कदम यांनी सांगितले, तर काही ठिकाणी कुटुंबप्रमुख घरात नसल्याने सुट्टीच्या दिवशी किंवा संध्याकाळी या असे सांगितले जात असल्याचे वांद्रे येथील पल्लवी काळे यांनी सांगितले.

लाडकी बहिणीचे पैसे कधी मिळणार?

बऱ्याच चाळी किंवा झोपडपट्टी भागात घरातील इतर सदस्यांना योग्य माहिती नसते. बरीच कुटुंबे एकत्र राहत असल्याने घराघरांत वाद असतात. अशावेळी नक्की कोणाची माहिती घ्यायची यावरून वाद होतात. काही ठिकाणी नागरिक प्रश्नांची उत्तरे न देता उलट प्रगणकांनाच प्रश्न विचारत आहेत. यात लाडकी बहिणीचे पैसे कधी मिळणार? या महिलांच्या प्रश्नाने तर तर प्रगणक बेजार झाले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT