मुंबई/नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक-मुंबई लोकल रेल्वेसेवा सुरू करावी याबाबतची मागणी नाशिककरांकडून मागील काही वर्षांपासून सातत्याने केली जात आहे. मात्र, कसारा घाटातील बोगद्याचा अडसर असल्याने, ही मागणी अद्यापही पूर्ण होऊ शकली नाही. दरम्यान, कसारा घाट ते मनमाड रेल्वेमार्ग अशा १४० किमीवर समांतर रेल्वे ट्रॅक टाकला जाणार असल्याने आणि बोगद्याचा डायमीटर वाढविला जाणार असल्याने, नाशिक-मुंबई लोकल सेवा लवकरच धावण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नाशिकहून कामानिमित्त मुंबईला जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अनेक जण दररोज मुंबई-नाशिक असा एक्स्प्रेसने प्रवास करतात. पंचवटी एक्स्प्रेस नोकरदारांची रेल्वे म्हणून ओळखली जात आहे. दरम्यान, नाशिकहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता नाशिक-मुंबई लोकल सेवा सुरू करण्याबाबतची मागणी मागील काही वर्षांपासून सातत्याने केली जात आहे. दरम्यान, कसारा घाट ते मनमाड या १४० किमीच्या समांतर रेल्वेमार्गाला मंजुरी देण्यात आल्याने, लवकरच लोकल सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. समांतर रेल्वेमार्ग तयार करताना चार नवीन रेल्वेस्थानके उभारण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेने याबाबतचा प्राथमिक आराखडा तयार केल्याची माहिती समोर येत आहे. नवीन मार्गावर न्यू नाशिक रोड, न्यू पाडळी, वैतरणानगर, चिंचखैरे ही चार नवीन स्थानके तयार होणार आहेत.
समांतर रेल्वेमार्ग टाकताना १२ नवीन बोगदे तयार होणार आहेत. नवीन रेल्वेलाइनमुळे वेळेची आणि इंधनाची बचत होणार आहे. दरम्यान, नवीन रेल्वेमार्गामुळे नाशिक-मुंबई दळणवळण सुविधा अधिक गतिमान होणार असून, नाशिक-मुंबईमधील अंतर कमी होणार आहे.
नवीन समांतर रेल्वेलाइन टाकण्यासाठी मध्य रेल्वेने सुमारे चार हजार कोटींचा प्राथमिक आराखडा तयार केला आहे. पूर्वी कसारा घाटात असलेल्या बोगद्याच्या आकारामुळे लोकल से-वेला अडथळा होता. नव्या लाइन टाकल्यास नाशिक-कसारादरम्यान येणाऱ्या दोन बोगद्यांचा डायमीटर वाढविला जाणार आहे. त्यामुळे ही तांत्रिक अडचण दूर होणार असल्याने, या सेवेला ग्रीन सिग्नल मिळाल्याची माहिती समोर येत आहे.