Mumbai Protest | मुंबईतील आंदोलनाला नसीरुद्दीन शाह, विशाल ददलानी, शबाना आझमींची उपस्थिती 
मुंबई

Mumbai Protest | मुंबईतील आंदोलनाला नसीरुद्दीन शाह, विशाल ददलानी, शबाना आझमींची उपस्थिती

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टीने (सीजेपी) शुक्रवारी (दि. २) गांधी जयंतीच्या दिवशी शिवाजी पार्क येथे केलेल्या जेल भरो आंदोलनाला तरुणाईचा जोरदार प्रतिसाद लाभला. या आंदोलनाला चित्रपट आणि कला क्षेत्रातील नामवंतांनी पाठिंबा देऊन प्रत्यक्ष हजेरीही लावली.

प्रेमानेच घरी पाठवायचेय : ददलानी

गायक-संगीतकार विशाल ददलानी यांनी आंदोलनस्थळी येऊन ‘सीजेपी’ला पाठिंबा दिला. त्यांनी ‘गो ग्‍यानू गो’ अशा घोषणा दिल्या.

मतदानाचा अधिकार महत्त्‍वाचा : शबाना

‘तुमचे मत हा तुमचा आवाज आहे, तुमचा अधिकार आहे,’ असे आवाहन करत ज्येष्ठ अभिनेत्री आणि सामाजिक कार्यकर्त्या शबाना आझमी यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला.

अभिनेता नसीरुद्दीन शाह यांनी दीपके यांना पाठिंबा दिला. यावेळी तुषार गांधी, अभिजित बिचुकले उपस्थित होते.

तरुणाईसह विविध घटकांचा सहभाग

आंदोलनात तरुण तसेच विद्यार्थी संघटनांशी संबंधित कार्यकर्तेही सहभागी झाले होते. पुणे, नाशिक, अहिल्यानगरसह विविध भागांतून नागरिक आंदोलनासाठी मुंबईत आले होते.

आंदोलनात यांचाही सहभाग

आंदोलनात सहभागी झालेल्या पुण्यातील निखिल या अपंग तरुणाने लक्ष वेधून घेतले. मी पीएच.डी. करत आहे. परंतु, देशाची बिघडलेली व्यवस्था पाहून मोठा बदल होणे अपेक्षित असल्याच्या भावना त्याने व्यक्त केल्या. अहिल्यानगर जिल्ह्यातून चार वर्षांच्या मुलाला घेऊन आलेली ललिता हिने मुलाच्या आणि देशाच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आले, असे सांगितले.

स्थानिकांचा विरोध

आंदोलनापूर्वी शिवाजी पार्क परिसरातील काही रहिवाशांनी ध्वनी प्रदूषण, वाहतूक कोंडी आणि परिसरातील शांततेचा मुद्दा उपस्थित करत आंदोलनाला विरोध केला होता. परंतु, आंदोलनादरम्यान स्थानिकांकडून कोणताही तीव्र विरोध झाला नाही.

‘सीजेपी’चे आंदोलन असंविधानिक; भाजपचे मंत्री आशिष शेलार, लोढा यांचा घणाघात

‘एसआयआर’च्या नावाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला कोणतेही घटनात्मक अधिष्ठान नाही. ‘सीजेपी’चे हे आंदोलन असंविधानिक आहे, अशी टीका सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केली. भाजप प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष केशव उपाध्ये, प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन, मुख्यालय प्रभारी रवींद्र अनासपुरे, सहमाध्यमप्रमुख ओमप्रकाश चौहान उपस्थित होते. या आंदोलनामागे विद्यार्थ्यांचे हित नसून, विरोधकांकडून स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केला. हे विरोधी पक्षांचे षड्‌यंत्र असून या प्रवृत्तींना परदेशातूनही मोठ्या प्रमाणात मदत मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT