Narmada boat ambulance pudhari photo
मुंबई

Narmada boat ambulance : नर्मदेच्या लाटांवर आरोग्याची ‘जीवनवाहिनी’!

बोट रुग्णवाहिकेने आदिवासी पाड्यांपर्यंत उपचार; वर्षभरात ११ हजार ६१५ जणांची तपासणी

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : अदिती कदम

नर्मदेच्या अथांग पात्रातून धावणारी बोट... आणि याच बोटीतून दुर्गम गावांपर्यंत पोहोचणारी आरोग्यसेवा! रस्ते नाहीत, वाहतुकीची साधने सहज उपलब्ध होत नाहीत, तर कुठे बॅकवॉटर पार करून आरोग्य केंद्र गाठावे लागते. अशा प्रतिकूल परिस्थितीत नर्मदा काठावरील आदिवासी नागरिकांसाठी बोट रुग्णवाहिका आणि फ्लोटिंग डिस्पेन्सरी ‘जीवनवाहिनी’ ठरत आहे.

गर्भवती महिला, लहान मुले, सर्पदंशाचे रुग्ण तसेच गंभीर आजाराच्या रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत, यासाठी निश्चित वेळापत्रकानुसार बोट विविध गावांमध्ये पोहोचते. तपासणी, औषधोपचार आणि प्राथमिक उपचारांसह गरजेनुसार पुढील उपचारासाठी रुग्णांना संदर्भसेवाही दिली जात आहे.

मार्च २०२६च्या उपलब्ध अहवालानुसार, तीन फ्लोटिंग ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून वर्षभरात ११ हजार ६१५ बाह्यरुग्णांची तपासणी करण्यात आली. तसेच ० ते ६ वर्षे वयोगटातील २ हजार ५३ बालकांची तपासणी, ७२५ आंतररुग्ण सेवा आणि १३२ गर्भवतींची नोंदणी करण्यात आली. दुर्गम भागातील नागरिकांसाठी जलमार्गाने पोहोचणारी ही आरोग्यसेवा मोठा आधार ठरत आहे.

ही सेवा अधिक सक्षम करण्यासाठी बोट रुग्णवाहिका केंद्रांवर प्रतीक्षा कक्ष उभारण्याबरोबरच प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांसाठी निवास व्यवस्था उभारण्याच्या दिशेने जिल्हा प्रशासनाने पावले उचलली आहेत. त्यामुळे दुर्गम भागात आरोग्यसेवा सातत्याने उपलब्ध ठेवण्यास मदत होणार आहे. रस्ता जिथे संपतो, तिथून नर्मदेच्या लाटांवर आरोग्यसेवेचा प्रवास सुरू होतो. भौगोलिक अडथळयावर मात करत जलमार्गाने आरोग्य यंत्रणा दुर्गम गावांपर्यंत पोहोचत आहे. त्यामुळे नंदुरबारची ही बोट रुग्णवाहिका हजारो नागरिकांसाठी ‘जीवनवाहिनी’ ठरत आहे.

  • फ्लोटिंग डिस्पेन्सरी म्हणजे केवळ रुग्णांची वाहतूक करणारी बोट नव्हे, तर नदीच्या प्रवाहावर चालणारे छोटे आरोग्य केंद्रच! नागरिकांची तपासणी, औषधोपचार आणि आवश्यक उपचार एकाच ठिकाणी मिळत असल्याने दुर्गम भागातील नागरिकांचा वेळ, प्रवासाचा त्रास आणि खर्च वाचत आहे.

  • नर्मदा काठावरील आणि बॅकवॉटरलगतच्या गावांमध्ये पावसाळ्यात आरोग्य केंद्रापर्यंत पोहोचणे अधिकच कठीण होते. आपत्कालीन परिस्थितीत प्रत्येक मिनिट महत्त्वाचे असताना रस्त्याने होणारा विलंब रुग्णाच्या जीवावर बेतू शकतो. त्यामुळे जलमार्गाचा पर्याय प्रभावी ठरत असून, बोट रुग्णवाहिकेमुळे आरोग्य यंत्रणाच थेट गावाच्या दारात पोहोचत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT