Narhari Zirwal on milk adulteration
मुंबई: अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) विभागात दाखल झाल्यानंतर वरिष्ठ अधिकारी तुकाराम मुंढे यांनी राबविलेल्या भेसळविरोधी मोहिमेमुळे राज्यातील दूध संघांमधील दूध संकलनात तब्बल २० ते २५ टक्क्यांची घट झाली असल्याची कबुली अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली.
विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान जालना जिल्ह्यातील बनावट तुपाच्या कारखान्यावरील कारवाईबाबत आमदार प्रकाश सोळंके यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावरील चर्चेत उपप्रश्न विचारताना आमदार गोपीचंद पडळकर यांनी दुधातील भेसळीचा गंभीर प्रकार सभागृहासमोर आणला.
पडळकर म्हणाले की, 'एका शेतकऱ्याच्या गोठ्यात एकही जनावर नसताना त्याच्याकडून दररोज दूध संघात १५० लिटर दूध पाठवले जात होते. पश्चिम महाराष्ट्रात किंवा अन्य ठिकाणी असलेल्या दूध संघांमध्ये अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई होण्यापूर्वी किती दूध येत होते आणि कारवाई सुरू झाल्यावर त्यात किती तफावत पडली, याचा रेकॉर्ड तपासला पाहिजे.
माझ्या जिल्ह्यातील बऱ्याच दूध संघांमध्ये दुधापासून इतर उपपदार्थ तयार करणे आता कमी झाले आहे. दुधात युरिया मिसळणारे हे नराधम महाराष्ट्रातील करोडो लोकांच्या जीवाशी खेळत असून, तपासणीत दोषी आढळणाऱ्या दूध संघांच्या मालकांवर सरकार काय कारवाई करणार?, असा प्रश्न त्यांनी केला.
यावर उत्तर देताना मंत्री नरहरी झिरवाळ यांनी, ज्या दिवसापासून विभागाने भेसळविरोधी कठोर कारवाई सुरू केली आहे, तेव्हापासून दूध संकलनात २० ते २५ टक्क्यांची घट झालेली दिसून आल्याचे सांगितले. त्यावर, पडळकर यांच्यासह अन्य आमदारांनी कारवाईची मागणी केली. तेव्हा, तपासणीअंती दोषी आढळलेल्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, असे मंत्री झिरवाळ यांनी सांगितले.
बनावट तुपाचा साठा आढळला
दरम्यान, जालना जिल्ह्यातील तीर्थपुरी येथील 'मे. मुंदडा इंडस्ट्रीज' या तुपाच्या कारखान्यावरील छाप्यात बनावट तुपाचा साठा सापडला. कंपनीविरोधात कारवाई करण्यात आली आहे. भेसळखोरांसाठी सद्यस्थितीत असलेले कायदे पुरेसे कठोर आहेत; परंतु त्यांची नीट अंमलबजावणी होत नसल्यामुळे अडचण होते, अशी कबुलीही त्यांनी दिली.
तसेच मुंदडा कंपनीच्या मालकाचा परवाना रद्द करण्यात आला असून त्यांना लवकरच अटक केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. या चर्चेत आमदार अर्जुन खोतकर, किशोर आप्पा पाटील, सुधीर मुनगंटीवार, नाना पटोले यांनीही उपप्रश्न केले.
आमदाराच्या जेवणात माशी
दूध आणि तुपाच्या भेसळीची चर्चा सुरू असतानाच आमदार विकास ठाकरे यांनी विधान भवनातील अन्न सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला.विधिमंडळात दुपारी प्रत्येक जण विधान भवनाच्या परिसरातच जेवणासाठी जातो. मात्र, येथील अन्न सुरक्षित आहे का? आमच्या पक्ष कार्यालयात आमदार अमित झनक जेवत असताना त्यांच्या जेवणात चक्क माशी आढळली.
त्यामुळे विधान भवन परिसरात येणाऱ्या अन्नाची दर्जा चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी ठाकरे यांनी केली. आमदारांच्या आरोग्याशी संबंधित या विषयाची गंभीर दखल घेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी, या प्रकरणाची विधिमंडळ स्तरावर चौकशी करून तातडीने उचित उपाययोजना करण्याचे आश्वस्त केले.