राजदंडालाच हात घातल्याबद्दल पटोले दिवसभरासाठी निलंबित -
मुंबई

Nana Patole: राजदंडालाच हात घातल्याबद्दल पटोले दिवसभरासाठी निलंबित

लोणीकर, कोकाटे यांच्या वक्तव्यांचे विधानसभेत तीव्र पडसाद

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : सातत्याने शेतकर्‍यांचा अपमान करणारे भाजप आमदार बबनराव लोणीकर आणि कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी मंगळवारी विधानसभेत आक्रमक पवित्रा घेतला. माफीनाम्याची मागणी करत त्यांनी थेट विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या आसनाकडे धाव घेत थेट राजदंडालाच हात घातला. यावर, समज देऊन ऐकत नसल्याने विधानसभेचे कामकाज सुरळीत चालविण्यासाठी पटोले यांना दिवसभरासाठी निलंबित करण्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांनी केली. या कारवाईच्या निषेधार्थ विरोधी पक्षांनी कामकाजावर बहिष्कार टाकत सभात्याग केला. यादरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी पटोलेंच्या माफीची मागणी केली.

विधानसभा सभागृहात कामकाजाचा दुसरा दिवस पटोलेंच्या निलंबनाने गाजला. प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर पटोले यांनी कोकाटे आणि लोणीकर यांच्या वादग्रस्त विधानांचा मुद्दा उपस्थित केला. महायुतीच्या नेत्यांकडून शेतकर्‍यांचा सातत्याने होणारा अपमान संतापजनक आहे. लोणीकर आणि कोकाटे यांच्या विधानांनी शेतकर्‍यांच्या भावना दुखावल्या आहेत. मला रोज निलंबित केले तरी मी आता थांबणार नाही. शेतकर्‍यांचा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही. मोदी तुमचा बाप असेल, तो शेतकर्‍यांचा बाप होऊ शकत नाही, अशी आक्षेपार्ह टीकाही पटोले यांनी केली. शेतकर्‍यांच्या भावना दुखावल्याप्रकरणी आता मुख्यमंत्र्यांनीच सभागृहात शेतकर्‍यांची माफी मागावी, अशी मागणीही पटोले यांनी केली. यावेळी विरोधी बाकावरील सदस्यांनी आक्रमक होत घोषणाबाजीला सुरुवात केली. दरम्यान, पटोले हे थेट विधानसभा अध्यक्षांच्या आसनापर्यंत धावून गेले. तसेच, त्यांनी अध्यक्षांच्या आसनासमोरील राजदंडालाही स्पर्श केला. या गदारोळामुळे अध्यक्ष नार्वेकर यांनी सभागृहाचे कामकाज पाच मिनिटांसाठी तहकूब केले. कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर विरोधक आपल्या मागणीवर ठाम होते. नाना पटोले हे पुन्हा एकदा आक्रमक झाले.

विधानसभा अध्यक्षांच्या अंगावर धावून जाणे चुकीचे. हे अत्यंत अयोग्य आहे. त्याबद्दल पटोले यांनी सभागृहाची माफी मागितली पाहिजे.
देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
मोदी तुमचा बाप असेल, तो शेतकर्‍यांचा बाप होऊ शकत नाही. शेतकर्‍यांच्या अपमानाबद्दल मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी.
नाना पटोले, काँग्रेस आमदार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT