ठाणे : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी मुंबईतील आझाद मैदानात सुरू केलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा बांधव मुंबईत मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. यामुळे वाहतूक व्यवस्थेवर याचा मोठा परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी ठाणे येथे आंदोलकांची वाहने सोमवारपासून रोखून धरण्यास सुरुवात केल्याने वाहतुकीची कोंडी होऊन पाच किमीपर्यंत रांगा लागल्या.
ठाणे शहरातून मुंबईत प्रवेश करणार्या गाड्यांची तपासणी पोलिसांनी सुरू केली असून यात आंदोलकांची वाहने पोलिस रोखून धरत आहेत. ठाण्यातील मुलुंड आणि आनंदनगर चेकनाका येथे मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
अभूतपूर्व वाहतूक कोंडीमुळे कामावर जाणार्या लोकांना याचा मोठा फटका बसला. तसेच, शाळकरी मुलांचेही हाल झाले. रात्री उशिरापर्यंत ही वाहतूक कोंडी कायम होती. ती दूर करताना पोलिसांनाही कसरत करावी लागली.