मुंबई : राज्यातील नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांची उद्या होणारी मतमोजणी २१ डिसेंबरला एकत्रित करण्याचा निर्णय नागपूर खंडपिठाने दिला आहे. या निर्णयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली आहे. "सर्व मतमोजणी पुढे ढकलणे योग्य नाही, ही पद्धत पूर्णपणे चुकीची आहे," असे त्यांनी म्हटले आहे.
माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, "कोर्टाने जर निर्णय दिला असेल तर तो मान्य करावाच लागेल. पण कोर्टात गेल्या काही काळात ही जी पद्धती वापरली जात आहे ती योग्य वाटत नाही. सिस्टीम फेल्यूअरमुळे जे होत आहे ते योग्य नाही. यात निवडणूक आयोगाने सुधारणा आणली पाहीजे, कारण त्यांना अनेक निवडणुका घ्यायच्या आहे. जो कायदा आहे त्याची चुकीची माहिती वकिलांनी दिली. ज्या ठिकाणी सर्व गोष्टींचा अवलंब झाला आणि कुणीतरी कोर्टात गेलं म्हणून निवडणुका पुढे ढकलल्या हे चुकीचं आहे. मी कालही माझी नाराजी दर्शवली आहे. सगळी प्रक्रिया कायदेशीर होत नाही यावर नाराजी आहे. आता सर्व मतमोजणी थांबवणे हे देखील योग्य नाही, असे ते म्हणाले.
लोकशाहीची जाण ठेवली पाहिजे. आपण कसे वागतो, काय संकेत देतो, याचा विचार केला पाहीजे. सगळेच एकमेकांवर आरोप करतात, या निवडणूका शांतपणे पार पडल्या आहेत. काही ठिकाणी टोकाचे मतभेद झाले ते योग्य नाही, असेही फडणवीस म्हणाले.