मुंबई: सात वर्षांपासून संक्रमण शिबिरात राहणाऱ्या ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळीतील रहिवाशांना लवकरच दिलासा मिळणार आहे. पुनर्वसन प्रकल्पातील ५५७ घरांचा ताबा नवरात्रोत्सवाच्या मुहूर्तावर देण्याची तयारी मुंबई मंडळाने सुरू केली आहे.
ना. म. जोशी मार्ग येथील दोन पुनर्वसित इमारतींचे काम पूर्ण झाले असून त्यामधील ३४२ सदनिकांना नुकतेच भोगवटा प्रमाणपत्र मिळाले आहे.
ही घरे सप्टेंबरअखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देण्याचे नियोजित होते. दरम्यान, या कालावधीत तिसऱ्या पुनर्वसित इमारतीचेही काम पूर्ण झाले आहे. या इमारतीमधील २१५ घरांना येत्या आठवडाभरात भोगवटा प्रमाणपत्र मिळणे अपेक्षित आहे. त्यामुळे ३४२ ऐवजी थेट ५५७ घरांचे एकत्रित वाटप करण्याचा निर्णय मुंबई मंडळाने घेतला आहे.
बीडीडी चाळ पुनर्विकासाला सुरुवातीला मोठा विरोध असताना ना. म. जोशी मार्ग येथील रहिवाशांनी सर्वप्रथम पुढाकार घेत आपली घरे रिकामी करून दिली होती. असे असूनही वरळी आणि नायगाव येथील रहिवाशांना दोन-तीन टप्प्यांत घरे मिळाली, मात्र ना. म. जोशी मार्ग येथील
एकाही कुटुंबाला आतापर्यंत ताबा मिळाला नव्हता. त्यामुळे रहिवाशांमध्ये प्रचंड नाराजी होती. अखेर म्हाडाने कामाला वेग दिल्याने आता ही प्रतीक्षा संपणार आहे.