मुंबई : कर्नाटकच्या ऐतिहासिक म्हैसूर शहरात धडकून एका एमडी ड्रग्जच्या कारखान्याचा साकिनाका पोलिसांनी पर्दाफाश केला. वसई येथील एमडी ड्रग्जच्या कारखान्यांचा पर्दाफाश केल्यानंतर याच पथकाने म्हैसूरमध्ये कारवाई करत चार आरोपींना अटक केली. त्यांना स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
म्हैसूरमध्ये गॅरेजच्या आड सुरू असलेला एमडी ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त करत 381 कोटी 96 लाखांच्या एमडीसह एमडी ड्रग्ज बनविण्यासाठी लागणारे साहित्य पोलिसांनी जप्त केले. चालू वर्षातील एमडी ड्रग्ज तस्करीतील ही आतापर्यंत सर्वांत मोठी कारवाई होय.
गेल्या एप्रिलमध्ये साकिनाका पोलिसांच्या एका विशेष पथकाने अंधेरी आणि मिरारोड येथून सादिक शेख, सिराज पंजवानी आणि काळूराम चौधरी या तिघांना अटक केली होती. या तिघांकडून एमडी ड्रग्जचा साठा जप्त केला होता. काळूरामने पालघरच्या वसई येथील कामण गावात एमडी ड्रग्जचा कारखाना सुरु असल्याचे सांगितले होते. तेथे छापा मारून पोलिसांनी आठ कोटी पंधरा लाख रुपयांचे एमडी ड्रग्ज व इतर साहित्य जप्त केले.
या प्रकरणातील फरार आरोपी सलीम शेखचा शोध सुरु असताना सलीम इम्तियाज शेख ऊर्फ सलीम शेख ऊर्फ सलीम लगंडा याला वांद्रे येथून शुक्रवारी या पथकाने अटक केली. पोलीस कोठडीत त्याने म्हैसूर शहरात सुरु असलेल्या ड्रग्ज कारखान्याची माहिती दिली होती.
अतिरिक्त पोलीस आयुक्त परमजीतसिंह दहिया, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे एसीपी संपत पाटील, प्रदीप मैसाळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर, एपीआय दयानंद वणवे, पीआय पंकज परदेशी, हवालदार शशिकांत पाटील, चंद्रकांत पवार, नितीन खैरमोडे, शिपाई अनिल करांडे या पथकाने म्हैसूर रिंग रोडवर निळ्या रंगाच्या शेडवर छापा टाकला.