मुंबई : पुढारी वृत्तसेवा
अर्थसंकल्पीय अधिवेशनात नियमानुसार कामकाज होत नसल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून केला जात आहे. त्याचेच तीव्र पडसाद शुक्रवारी विधानसभेत उमटले.
शुक्रवारची कामकाज पत्रिका ४२ पानांची आणि त्यात तब्बल ३० लक्षवेधी सूचनांचे कामकाज ठेवण्यात आले होते. अधिवेशन संपले तरी या ४२ पानांचे कामकाज संपणार नसल्याचे सांगत शिव सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधवांसह विरोधी आमदारांनी नाराजी व्यक्त केली. यावर, जाधव आणि शिवसेना आमदार निलेश राणे यांच्यात अक्षरशः एकेरीत हमरीतुमरी सुरू झाली.
राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज सध्या चर्चेचा मुद्दा बनला आहे. नियमांनुसार कामकाज होत नाही, संख्याबळावर कामकाज रेटले जात असल्याचा विरोधकांचा आरोप आहे. शुक्रवारी आठवड्याच्या कामकाजाच्या अखेरच्या दिवशी ३५ लक्षवेधींचा समावेश कामकाज पत्रिकेत करण्यात आला होता. यात गेल्या अनेक दिवसांपासून शिल्लक असलेल्या लक्षवेधींचा भरणा होता. मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात लक्षवेधींचा समावेश करण्यात आल्याने विरोधकांना २९३ च्या प्रस्तावावर आणि इतर प्रस्तावांवर चर्चा करण्यास कमी वेळ मिळणार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी तालिका अध्यक्ष योगेश सागर यांच्याकडे दाद मागितली. यावेळी जयंत पाटील यांनी विधानसभा कामकाज नियमांची आठवणही योगेश सागर यांना करून दिली. जयंत पाटील यांच्यासह शिवसेना उबाठाचे आमदार भास्कर जाधव यांनीही सभागृहाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. भास्कर जाधव म्हणाले की, लक्षवेधी सूचना या एका मतदारसंघाच्या असतात, पण मागण्यांवरील चर्चा या सर्व राज्याच्या असतात. त्यामुळे तुम्ही एका दिवशी तीस लक्षवेधी सूचना कशा घेतल्या, असा सवाल भास्कर जाधव यांनी केला. त्यावर निलेश राणे यांनी मागील बाकावरून काहीतरी शेरेबाजी केली. त्यामुळे भास्कर जाधव संतप्त झाले. भास्कर जाधव व निलेश राणेंमध्ये प्रचंड शाब्दिक बाचाबाचीसुद्धा झाली. जाधव-राणे यांच्यातील हा वाद एकेरी उल्लेखापर्यंत येऊन पोहचला.