कल्याण: तब्बल साडे सहा वर्षाच्या प्रदीर्घ कालावधी नंतर निवडणूक पार पडल्यावर लोकप्रतिनिधी राजवटीतील स्थायी सभापती निवडीनंतरच्या शुक्रवारच्या पहिल्या स्थायी समितीच्या सभेत विविध 34 विषय असून कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्याचा प्रस्ताव विषय पटलावर ठेवण्यात आल्याने कोटीच्या कोटींची उड्डाणे असलेल्या कामांना मंजुरी देण्यात येणार असल्याचे दिसून येत आहे.
स्थायी समिती म्हणजेच पालिकेच्या आर्थिक तिजोरीचा कारभार. निविदा मंजुरी व धोरणात्मक निर्णय घेणे तसेच स्थायी समितीमध्ये पालिकेतील आर्थिक कामाच्या प्रस्तावांना मंजुरी दिली जात असते. स्थायी समिती ही महापालिकेची सर्वात महत्त्वाची वैधानिक कार्यकारी संस्था आहे. शहराच्या आर्थिक आणि धोरणात्मक निर्णयांवर तिचा थेट प्रभाव असतो. शहराच्या आर्थिक तिजोरीचा खरा कारभार हा इथेच ठरतो.
25 लाखांपेक्षा जास्त खर्चाच्या कामांना स्थायी समितीची मंजुरी आवश्यक असते. त्याकरिता25 लाखांपेक्षा अधिक खर्चाच्या कामांना मंजुरी देण्याचे प्रस्ताव स्थायी समितीच्या विषय पटलावर सादर केले जातात. कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेच्या स्थायी समितीची सभा उद्या दुपारी 2 वाजता होणार आहे.
या स्थायी समिती सभेच्या पटलावर एकूण 35 विषय पटलावर ठेवण्यात आलेले आहेत. यामध्ये महत्वाचा प्रस्ताव आरोग्य विभागाचे आहेत. पालिकेतील रुग्णालयांना दोन वर्षासाठी लागणाऱ्या आरोग्य साहित्य, औषधे, एक्सरे फिल्म, रसायने, रक्त तपासणी प्रयोग शाळा साहित्य, किट्स तसेच रुग्णालयातील कापड व कपडे धूलाई, शीतपेट्यांचे समावेशक करार, मेडिकल ऑक्सिजन सिलेंडर भरून देणे, सर्जिकल साहित्य आदी खरेदीच्या कोटी रुपयांच्या निविदाचे प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवले आहेत.
मोठ्या प्रमाणावर आरोग्य सेवा साहित्यावर खर्च केला जाणार असल्याने पालिकेची आरोग्य सेवा सक्षम होणार आहे. तसेच डोंबिवली पूर्वेकडील बेघरांसाठी निवारा केंद्र तीन वर्षांच्या देखभाल कालावधीसाठी 90 लाभार्थ्यांना वस्तू व सेवा पुरविणे 1 कोटी 27 लाखाचा विषय पटलावर आहे.
महापौर निवासस्थान दुरुस्तीकरीता 57 लाख रुपयांची निविदा मंजुरीसाठी आहे. माणेरे येथील सरकारी जागेभोवती तसेच काटेमानिवली येथील सरकारी भूखंडास संरक्षक भिंत बांधण्याकरिता 1 कोटी रुपये खर्चाचा विषय आहे. महापालिकेच्या 9 प्रभाग क्षेत्र कार्यालयाच्या हद्दीतील नालेसफाईच्या कामाची 3 कोटी 41 लाख रुपयांची निविदा काढण्याचा विषयही पटलावर आहे.
या सहा अन्य विविध विषयांचा समावेश आहे. पालिकेच्या पहिल्याच स्थायी समितीच्या सभेत कोट्यवधी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी दिली जाणार आहे. कोटीच्या कोटी उड्डाणाच्या विषयाच्या स्थायी समितीच्या सभेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
समितीच्या पटलावर 35 विषय
स्थायी समितीमध्ये होणाऱ्या सभेमध्ये 35 विषय पटलावर ठेवण्यात येणार आहेत. कोटीच्या कोटी उड्डाणाच्या विषयावर आधारित होणाऱ्या या स्थायी समितीच्या सभेकडे अवघ्या जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.