मुंबई : दिलीप सपाटे
राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकांसाठी मतदान होणार असताना प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर छुप्या पद्धतीने सुरू असलेले पैसे वाटप आणि हाणामाऱ्यांच्या घटनांनी निवडणुकीला गालबोट लागले आहे.
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जळगावसह राज्यात अनेक ठिकाणी राजकीय पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याने त्यांच्यात वादाच्या घटना घडल्या. काही ठिकाणी या वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले.
घाटकोपरमध्येही दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते पैसे वाटपावरून भिडले. शिंदेंच्या शिवसेनेकडून पैसे वाटप होत असल्याच्या आरोपावरून हा वाद झाला. यावेळी ठाकरे आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याने वातावरण तापले होते. या प्रकरणी पोलिस ठाण्यात शिंदे गटाच्या काही कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले. मात्र, शिंदे गटाचे माजी नगरसेवक हारुन खान यांनी ठाकरे गटाचे पदाधिकारी इम्रान खान यांनी बाहेरून गुंड आणल्याचा आरोप केला.
डोंबिवलीच्या तुकारामनगर भागात पैसे वाटपाच्या संशयावरून भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते आपापसात भिडले. भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी आम्ही गणपती दर्शनासाठी गेलो असताना शिवसेना उमेदवार रवी पाटील आणि नितीन पाटील यांनी कोयत्याने हल्ला केल्याचा आरोप केला आहे. या हल्ल्यात उमेदवारांसह दोन्ही गटांचे चार जण जखमी झाले आहेत.
शिवसेना उमेदवार नितीन पाटील यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आम्ही कोणालाही मारले नाही. उलट भाजपचे लोक पैसे वाटताना पकडले गेले. पोलिसांना पहिला फोन आम्हीच केला. भाजपमध्ये प्रवेश केला नाही म्हणून आमदार रवींद्र चव्हाण हा राग काढत आहेत, असा दावा त्यांनी केला आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दोन्ही बाजूंनी पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
वरळीतील प्रभाग क्रमांक 193 च्या उबाठा शिवसेनेच्या उमेदवार हेमांगी वरळीकर यांचे पती हरिश वरळीकर यांनी बैठकीच्या नावाखाली महिलांना बोलावून पैसे वाटल्याचा दावा शिंदे गट आणि अपक्ष उमेदवारांनी केला. या संदर्भातील व्हिडीओ विरोधी उमेदवारांनी व्हायरल केला असून, त्यात हरिश वरळीकर महिलांच्या बैठकीत पैसे वाटप करताना दिसत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
जळगावमध्ये निवडणूक आयोगाच्या सर्वेक्षण पथकाने मोठी कारवाई करत तब्बल 29 लाख रुपयांची रोकड, 3 किलो चांदी आणि 8 तोळे सोने जप्त केले आहे. कोणतीही अधिकृत कागदपत्रे न सादर झाल्याने हा सर्व ऐवज सरकारी कोषागारात जमा करण्यात आला आहे. तर जळगावमध्येच प्रभाग 11 मध्ये शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांकडून पैसे वाटप होत असल्याचा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला. अपक्ष उमेदवारांनी याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करत कारवाईची मागणी केली आहे. या प्रकरणी शिवसेनेच्या महिला आघाडी जिल्हाप्रमुख सरिता माळी यांनी प्रचार रॅलीमध्ये काम करणाऱ्या बचत गटाच्या महिलांना त्यांच्या कामाचे पैसे दिले जात होते. मतदारांना पैसे वाटण्याचा कोणताही प्रकार घडलेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
वसई-विरारमध्ये मध्यरात्री गांगडी पाडा परिसरात बविआ आणि मनसे कार्यकर्त्यांनी भाजप-शिवसेना युतीच्या कार्यकर्त्यांवर पैसे वाटपाचा आरोप करत गोंधळ घातला. बोरीवलीतही मनसे आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष झाला असून, पोलिस सीसीटीव्हीच्या आधारे तपास करत आहेत. तर पनवेलमध्ये भाजप कार्यकर्ते पैसे वाटत असताना मनसे शहरप्रमुख योगेश चिले यांनी त्यांना रंगेहात पकडल्याचा दावा करण्यात आला आहे. हा वाद थेट पोलिस ठाण्यात पोहोचला. मतदानाच्या पार्श्वभूमीवर अशा घटनांमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून निवडणुकीला गालबोट लागले आहे.