Chief Electoral Officer S Chockalingam on Electoral Roll
मुंबई : मतदार यादीतील घोळ सुधारल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नका, हा विरोधी पक्षांनी दिलेला इशारा परतवून लावत शनिवारी (दि.18) रोजी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी विरोधकांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने १ जुलै २०२५ पर्यंत अद्ययावत असलेल्या याद्या केंद्रीय निवडणूक आयोगाकडून घेतल्या आहेत. विरोधी पक्षांच्या नेत्यांनी दाखवलेली मतदारांची दुबार नावे व वयांमधील फरक यामध्ये यापूर्वीच दुरुस्ती करण्यात आली असून संबंधित मतदारांचे नाव फक्त एकाच ठिकाणी असल्याचा दावाही मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने खास प्रसिद्धीपत्रकात केला आहे.
महाविकास आघाडीतील मित्रपक्षांसह मनसेच्या प्रमुख नेत्यांनी मंगळवारी आणि बुधवारी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांची मंत्रालयात भेट घेत आयोगाला धारेवर धरले होते. त्यानंतर विरोधकांनी पत्रकार परिषदेत एकाच मतदाराची अनेक ठिकाणी नावे, नाव आहे तर फोटो नाही, एकाच घरात दोनशेहून अधिक मतदार, मतदारांची यादीतून गायब झालेली नावे, अशी अनेक प्रकरणे उघडकीस आणली होती.
मतदारयादीतील घोळ आधी दुरुस्त करा आणि मगच निवडणुका घ्या, अशी एकमुखी मागणी करत विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला. या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी सविस्तर प्रसिद्धीपत्रक जारी करत विरोधकांचे मुद्दे खोडून काढले.
मेहता आणि बिलावा
विरोधकांनी पत्रकार परिषदेत जयश्री मेहता आणि मोहन बिलावा या दोन मतदारांचे नाव एकापेक्षा अनेकवेळा मतदार याद्यांमध्ये असल्याचा आरोप केला होता. यासंदर्भातील तपासणी केल्यानंतर जयश्री मेहता यांचे दहिसर मतदारसंघात दोन वेळा असलेले नाव २७ डिसेंबर २०२४ आणि २४ एप्रिल २० २५ रोजी वगळण्यात आले असून सध्या त्या राहत असलेल्या चारकोप मतदारसंघातील एकाच ठिकाणी त्यांचे नाव असल्याचा दावा मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी केला आहे. मोहन बिलावा यांचे भांडूप येथील एक नाव १५ एप्रिल २०२५ आणि विक्रोळी येथील नाव ९ एप्रिल २०२५ रोजी वगळण्यात आले आहे. सध्या त्यांचे नाव भांडूप मतदारसंघात एकाच ठिकाणी असून हा बदल १ जुलैच्या अद्ययावत यादीमध्ये केला असल्याचे निवडणूक अधिकारी कार्यालयाने म्हटले आहे.
कदम यांचे वय ५४
कांदिवली येथील धनश्री कदम यांचे वय २३ आणि दीपक कदम यांचे वय ११७ असल्याबाबत विरोधकांनी आक्षेप घेतला होता. त्यावरही आयोगाने स्पष्टीकरण दिले आहे. विरोधकांचा दावा हा ऑक्टोबर २०२४ ला प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीनुसार होता. मात्र, सद्याच्या अद्ययावत यादीमध्ये दीपक कदम यांचे वय ५४ वर्षे असल्याचे नमूद आहे.
नालासोपारा मतदारसंघातील सुषमा गुप्ता यांचे नाव एका यादीत भागात अनेकवेळा असल्याचे निदर्शनास येताच एकापेक्षा जास्त वेळा असलेले नाव वगळण्यासाठी १२ ऑगस्ट २०२५ रोजी अर्ज भरुन घेण्यात आला होता. त्यानुसार सात दिवसांची मुदत संपल्यानंतर म्हणजेच १९ ऑगस्ट रोजी वगळण्यात आले असून हे विधान चुकीच्या माहितीच्या आधारे असल्याचा दावा मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी केला आहे.
म्हणून तिथे ८०० मतदार
नाशिक जिल्ह्यामधील १२४ मतदारसंघात एकाच घरामध्ये ८०० पेक्षा अधिक मतदार असल्याचा गंभीर आरोप महाविकास आघाडीने पत्रकार परिषदेत केला होता. हा आरोपही आयोगाने फेटाळून लावला. स्थानिक अधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार नाशिक परिसरातील घरक्रमांक ३८९२ चे क्षेत्र सुमारे पंधराशे एक चौरस मीटर इतके आहे. याठिकाणी सुमारे ७०० निवासी अनिवासी बांधवी मिळकती असून याठिकाणी सुमारे ७०० निवासी अनिवासी बांधवी मिळकती असून त्यामध्ये ८०० पेक्षा जास्त मतदार राहतात. त्यामुळे त्या मतदारांच्या नावासमोर समान घर क्रमांक नमूद असल्याचे स्पष्टीकरण मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिले आहे.
पालिकेकडून घराला क्रमांक नाही
अमरावती येथील मतदान केंद्र क्रमांक २११ येथील यशोदा नगर आणि उत्तम नगर परिसरात मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी भाग व पाल टाकून वास्तवास असलेले मतदार राहतात. या झोपडपट्टींना महापालिकांकडून घर क्रमांक देण्यात आलेले नाही. त्यामुळे त्यांच्या नावासमोर घर क्रमांक नमूद नाही. त्या व्यतिरिक्त अन्य काही ठिकाणीही मतदार याद्यांमध्ये मतदारांचे घर क्रमांक सारखेच असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. त्याठिकाणीही घर क्रमांक नसणे किंवा मतदारांनी अर्ज करताना चुकीचा घर क्रमांक टाकल्यामुळे अशा बाबी समोर येत असल्याचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी आपल्या खुलाशा म्हटले आहे.
हे प्रसिद्धीपत्रक कोणत्याही सही, शिक्क्याशिवाय मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या फेसबूक भिंतीवर टाकण्यात आले असून, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या एका व्हाट्स अॅप ग्रुपवरही ते सर्व पत्रकारांना पाठविण्यात आले.
भारत निवडणूक आयोगाचे पोर्टल अत्यंत सुरक्षित
विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्यांमध्ये सुधारणा तसेच दुरुस्त्या करण्याची कार्यवाही निरंतर चालू असते. त्यासाठी भारत निवडणूक आयोगाचे पोर्टल अत्यंत सुरक्षित आहे. मतदार नोंदणी अधिकाऱ्याव्यतिरिक्त अन्य कोणालाही मतदार यादीमधील नोंदणी मध्ये बदल करता येत नाही, असे सांगत कोणत्याही राजकीय पक्षाचा प्रतिनिधी भारत निवडणूक आयोग तसेच मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाशी संबंधित नाही, असेही मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.